कोची : सबरीमाला मंदिरामध्ये प्रवश करण्यासाठी गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना विमानतळावरूनच माघारी परतावे लागले आहे. सबरीमाला आंदोलकांनी त्यांना विमानतळाबाहेरच पडू न दिल्याने प्रचंड विरोध पाहून माघार घ्यावी लागली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. यावरून केरळमध्ये मोठे घमासान माजले होते. आंदोलकांनी महिलांना प्रवेश करण्यास विरोध केला होता. यानंतर दोनवेळा मंदिर उघडण्यात आले होते. यावेळी मंदिराने वयाची अट घालत महिलांना प्रवेश देण्यास मंजुरी दिली होती.
आज सायंकाळी 5 वाजता सबरीमाला मंदिराचे दरवाजे 32 दिवसांसाठी उघडण्यात आले. मात्र, सकाळपासून तृप्ती देसाई सहा कार्यकर्त्यांसह कोची विमानतळावरच अडकल्या होत्या. त्या शुक्रवारी पहाटे 4.45 वाजता पोहोचल्या होत्या. देसाई आल्याचे कळताच भाजपा आणि संघाचे कार्यकर्ते विमानतळाबाहेर जमले आणि जोरदार विरोध करायला सुरुवात केली.
दरम्यान, तृप्ती देसाई यांनी आंदोलनकर्त्यांवर जोरदार टीका केली आहे. देसाई यांना न्यायला आलेल्या टॅक्सी चालकांनाही त्रास दिल्याचा दावा त्यांनी केला. तसेच त्या थांबणार असलेल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनाही या आंदोलकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप देसाई यांनी केला. अय्याप्पा यांचे भक्त असे वाईट कसे वागू शकतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत पुण्याला परतत असल्याचे सांगितले.