तिरुवनंतपुरम : शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात जाऊ पाहणारे केरळ भाजपाचे सरचिटणीस के. सुरेंद्रन यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश पट्टणमथिटा जिल्ह्यातील न्यायाधीशांनी दिला.अय्यप्पा मंदिरात चाललेले के. सुरेंद्रन व त्यांच्या चार साथीदारांना पोलिसांनी निलक्कल येथे शनिवारी रोखले. त्यांना अटक केल्यानंतर चित्तर पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले. के. सुरेंद्रन यांना रविवारी सकाळी न्यायाधीशांच्या निवासस्थानी हजर करण्यात आले. आपण निदर्शक म्हणून नव्हे, तर भाविक म्हणून मंदिरात चाललो होतो. तरीही पोलिसांनी अटकाव केला असा कांगावा के. सुरेंद्रन यांनी केला. कोठडीमध्ये पोलिसांनी आपल्याला वाईट वागणूक दिली, असा आरोप करून ते म्हणाले की, गरजेच्या आवश्यक वस्तू तर दिल्या नाहीतच; पण शौचालय वापरायलाही मनाई केली.(वृत्तसंस्था)के. सुरेंद्रन यांचा पोलिसांनी छळ केला नाहीभाजपचे राज्य सरचिटणीस के. सुरेंद्रन यांना चित्तर पोलिसांनी कोणताही त्रास दिलेला नाही, असे सांगून देवस्थान खात्याचे मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन म्हणाले की, के. सुरेंद्रन यांना अटक केल्यानंतर ठाण्यातील मुख्य निरीक्षकांच्या खोलीत बसविण्यात आले. कोठडीत दोन बेंच जोडून त्यांची झोपण्याची व्यवस्था केली.
Sabrimala Temple Issue: भाजपा नेत्याला न्यायालयीन कोठडी; अय्यप्पा मंदिरात जाण्यास केला मज्जाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 5:41 AM