राजस्थानात गेहलोत सरकारच्या 25 कोटींच्या जाहिरातींतून सचिन पायलट गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:36 AM2020-03-13T11:36:00+5:302020-03-13T11:36:55+5:30
मध्यप्रदेशमध्ये ज्येष्ठ नेत्यांना कंटाळून ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची घटना ताजी असताना राजस्थानमध्येही युवा नेते आणि ज्येष्ठ नेते यांच्यातील मतभेद समोर आले आहे.
नवी दिल्ली - मध्यप्रदेशातील काँग्रेसचे प्रमुख नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी ज्येष्ठ नेत्यांना कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेद चर्चेत आले होते. त्यातच आता गेहलोत-पायलट यांच्यात वादाची ठिंणगी पडेल, असा खुलासा झाला आहे.
राजस्थान सरकारने सत्तेत असताना मागील एक वर्षात सुमारे 25 कोटींच्या जाहिराती दिल्या आहेत. यामध्ये विविध वृत्तपत्रांमधील जाहिरातींचा समावेश आहे. मात्र या जाहिरातींमध्ये केवळ मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचाच फोटो प्रसिद्ध करण्यात आला. जाहिरातीत सचिन पायलट यांचा फोटो दिसून आला नाही. अॅडव्होकेट सहीराम गोदारा यांनी या संदर्भात मागविलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे.
गोदारा यांनी मागवलेल्या माहितीत, महिती व जनसंपर्क विभागाने म्हटले की, 2018 ते 2019 या कालावधीत सरकारने सुमारे 62 संस्थांना 25 कोटींच्या जाहिराती दिल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तपत्रांचा समावेश आहे. या जाहिरातीत केवळ अशोक गेहलोत यांचाच फोटो प्रसिद्ध झाला असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा फोटो कुठेही प्रसिद्ध करण्यात आला नाही.
या संदर्भात सचिन पायलट यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मध्यप्रदेशमध्ये ज्येष्ठ नेत्यांना कंटाळून ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची घटना ताजी असताना राजस्थानमध्येही युवा नेते आणि ज्येष्ठ नेते यांच्यातील मतभेद समोर आले आहे.