वायुसेना स्थापना दिनी सचिन तेंडुलकरची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 05:31 AM2019-10-09T05:31:41+5:302019-10-09T05:32:29+5:30
या सोहळ्यादरम्यान वायुसेना प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी फेब्रुवारी महिन्यात बालाकोट येथे केलेल्या यशस्वी हवाई हल्ल्यासाठी ५१ स्क्वॉड्रन आणि ९ स्क्वॉड्रन यांना सन्मानित केले
हिंडन : भारतीय वायुसेनाच्या मंगळवारी पार पडलेल्या ८७व्या स्थापना दिनानिमित्त हिंडन बेस येथे झालेल्या सोहळ्यास माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने उपस्थिती दर्शविली. वायुसेनेमध्ये मानद ग्रुप कॅप्टन बनणारा सचिन पहिला खेळाडू आहे.
२०१० साली सचिनला भारतीय वायुसेनेच्या वतीने मानद ग्रुप कॅप्टन पदाने सन्मानित करण्यात आले होते. वायुसेना स्थापना दिनाच्या शानदार सोहळ्यासाठी सचिन वायुसेनेच्या गणवेशात पत्नी अंजलीसह उपस्थित राहिला होता. यावेळी लष्कर, नौदल आणि वायुसेनाचे प्रमुखही उपस्थित होते. सचिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय सैनिकांचे आभारही मानले.
सचिनने टिष्ट्वट करुन सर्व देशबांधवांना वायुसेना स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतानाच सर्व सैनिकांचे आभरही मानले.
सचिनने म्हटले की, ‘वायुसेना स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. भारताला कायम सुरक्षित ठेवण्यासाठी देशाच्या प्रत्येक सैनिकाचे मी आभार मानतो. पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या स्वस्थ
आणि स्वच्छ भारत मिशनमध्ये आपला सर्वांचा उत्साह पाहून मी आशा करतो की, भारत नेहमीच स्वस्थ, स्वच्छ आणि सुरक्षित राहील. जय हिंद!’
या सोहळ्यादरम्यान वायुसेना प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी फेब्रुवारी महिन्यात बालाकोट येथे केलेल्या यशस्वी हवाई हल्ल्यासाठी ५१ स्क्वॉड्रन आणि ९ स्क्वॉड्रन यांना सन्मानित केले. बालाकोट मोहिमेत सहभागी झालेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि अन्य लढाऊ विमान पायलट यांनी फ्लायपास्टमध्ये सहभाग घेतला.