मध्य प्रदेशातील जैन दाम्पत्य १00 कोटींच्या संपत्तीचा त्याग करून घेणार संन्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 01:45 AM2017-09-17T01:45:21+5:302017-09-17T01:45:34+5:30
आपली तीन वर्षांची मुलगी आणि सुमारे १00 कोटी रुपयांची मालमत्ता त्यागून संन्यास घेण्याचा निर्णय मध्य प्रदेशातील एका जैन दाम्पत्याने घेतला आहे.
भोपाळ : आपली तीन वर्षांची मुलगी आणि सुमारे १00 कोटी रुपयांची मालमत्ता त्यागून संन्यास घेण्याचा निर्णय मध्य प्रदेशातील एका जैन दाम्पत्याने घेतला आहे.
सुमित राठौर (३५) आणि त्यांची पत्नी अनामिका (३४) हे २३ सप्टेंबर रोजी सुरतमध्ये सुधामार्गी जैन आचार्य रामलाल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संन्यासदीक्षा घेणार आहेत. हे दाम्पत्य भोपाळपासून ४00 कि.मी. अंतरावरील निमच येथील असून, राठौर कुटुंब स्थानिक राजकारण व व्यवसायात आहे. दाम्पत्याच्या निर्णयाने निमचमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांची तीन वर्षांची मुलगी इभ्या हिचे काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र निमच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व अनामिकाचे वडील अशोक चंडालिया यांनी सांगितले की, मी नातीचा सांभाळ करेन. दाम्पत्याला समजावणे कठीण आहे. त्यांना कोणीही रोखू शकत नाही.
सुमित यांचे वडील राजेंद्रसिंग राठौर यांचा सिमेंट कंपन्यांसाठी गोणपाटाच्या बॅगा बनवण्याचा कारखाना आहे. ते म्हणाले की, आम्हाला याची अपेक्षा होतीच; पण ते इतक्या लवकर हा निर्णय घेतील, असे वाटले नव्हते. सुमित व अनामिका यांच्या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक यांना धक्का बसला नाही. इभ्या आठ महिन्यांची असतानाच त्यांनी मुनी बनण्याचा मानस व्यक्त केला होता. तसेच ते दोघे स्वतंत्रही राहू लागले होते. (वृत्तसंस्था)
निर्णयावर दोघे राहिले ठाम
सुमित यांनी २२ आॅगस्ट रोजी आचार्य रामलाल यांच्या सुरत येथे झालेल्या प्रवचनाच्या वेळी संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला. आचार्यांनी त्यांना पत्नीची परवानगी घेण्यास सांगितले.
अनामिका यांनी परवानगी तर दिलीच, पण स्वत:ही संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय तातडीने सुरतेला धावले. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.
मात्र दोघे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. दीक्षा विधी होईपर्यंत त्यांनी मौनव्रत धारण केले आहे. सुमित व अनामिका यांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला आहे.