द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन हे सनातन धर्माविरोधात वक्तव्ये करून गंभीर अडचणीत सापडले आहेत. एकीकडे भाजपसह देशभरातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच, दिल्लीपासून अनेक ठिकाणी त्यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील ना-नफा हिंदू संघटना जन जागरण समितीने सनातन धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल उदयनिधी स्टॅलिन यांना थप्पड मारणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. तसेच, या संघटनेने विजयवाड्यात अनेक ठिकाणी याबाबत पोस्टर्सही लावले आहेत.
दुसरीकडे, गेल्या दोन दिवसांपूर्वी अयोध्येच्या तपस्वी शिबिरातील संत जगतगुरू परमहंस आचार्य यांनीही सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीबद्दल उदयनिधी यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी त्यांचा प्रतीकात्मक शिरच्छेद करण्यात आला. तसेच, जो कोणी उदयनिधी यांचे शिरच्छेद करून आणेल, त्याला 10 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. उदयनिधी यांनी देशातून डास, डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांसारखे सनातन धर्म संपवण्याच्या बोलण्याने आपण खूप दुखावलो आहोत, असे परमहंस आचार्य म्हणाले.
काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) चेन्नई येथे बोलताना सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. जसे की, डासांमुळे डेंग्यू, कोरोना आणि मलेरियासारखे आजार होतात. त्यांचा आपण विरोध करू शकत नाही, त्यांचा नायनाट करावा लागतो. सनातन धर्मही तसाच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
उदयनिधी स्टॅलिन यांनी वादावर दिलं स्पष्टीकरणसनातन धर्मावरील या टिप्पणीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांनीही स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले होते, "मी कधीही सनातन धर्माच्या अनुयायांच्या नरसंहाराची हाक दिलेली नाही. मी फक्त सनातन धर्मावर टीका केली आहे आणि सनातन धर्म नष्ट झाला पाहिजे, असं मी वारंवार सांगेन. भाजपचे काम खोट्या बातम्या पसरवणं आहे. आणि भाजप माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे."