दिल्ली विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा काल पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी आप आणि भाजपाने एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आप खासदारावर झालेल्या हल्ल्याचा हवाला देऊन सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपाने दिल्ली सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शनिवारी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपाच्या या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
संजय सिंह म्हणाले की, "भाजपा फक्त खोटं बोलत आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट आहे. दिल्लीत कोणीही सुरक्षित नाही. भाजपाचं उद्दिष्ट फक्त खोटं बोलणं आणि भांडणं हे आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीतील गुन्हेगारी नाही तर अरविंद केजरीवाल रोखत आहेत."
देशाचा सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणारा देशाचा सत्ताधारी पक्ष आता भांडणाचा पक्ष बनल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण होत आहे. आज यांनीच पुन्हा नवीन नाटक सुरू केलं आहे, त्याची शहानिशा झालेली नाही असंही म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत असल्याने भाजपाने हे केलं आहे. अमित शाह यांनी केजरीवाल यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन गुन्हेगारी रोखण्याचं काम करावं. ते माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कट रचत आहेत. आज एक बनावट व्हिडीओ चालवण्यात आला, ज्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. ते व्हिडीओ प्ले करत आहेत. न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई करावी.
खोट्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून लोकांचं लक्ष समस्यांपासून वळवायचं आहे. हे आम्ही होऊ देणार नाही. असाच प्रयत्न त्यांनी महाराष्ट्रात केला. ही ऑडिओ क्लिप इथे चालवणाऱ्या भाजपाच्या कोणत्याही व्यक्तीवर मानहानीचा गुन्हा दाखल केला जाईल असंही म्हटलं आहे.