नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकतीच 300 च्या वर औषधांवर बंदी जाहीर केली होती. याविरोधात मोठ्या कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत या निर्णयाविरोधात आवाज उठविला होता. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने सॅरिडॉनसह अन्य दोन औषधांच्या विक्रीवरील बंदी तात्पुरती उठविली आहे. तसेच या बंदीबाबत केंद्र सरकारकडे स्पष्टीकरणही मागितले आहे.
काही दिवसांपूर्वीच सरकारने 328 फिक्स डोज कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांवर तात्काळ बंदी घातली होती. यापैकी काही औषधे अशी आहेत, जी लोकांकडून लगेच आराम मिळण्य़ासाठी घेतली जातात. ही औषधे डोकेदुखी, खोकला, पोटदुखी सारख्या आजारांवर आहेत. एफडीसी औषधे आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. यामुळे त्यांच्यावर काही देशांमध्ये बंदी आहे. सरकार आणखी 500 औषधांवर बंदी आणण्याच्या तयारीत आहे.
बंदी आदेशामध्ये सरकारने ही औषधे उपचाराच्या उपयोगाची नाहीत, असा वाक्यप्रयोग केला होता. यावर औषध निर्माण कंपन्यांनी आक्षेप घेतला आहे.