नवी दिल्ली : व्हाइस ॲडमिरल सतीश घाेरमडे यांनी भारतीय नाैदलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्ली येथे झालेल्या औपचारिक समारंभात त्यांनी मावळते उपप्रमुख व्हाइस ॲडमिरल जी. अशाेक कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. नाैदलाच्या उपप्रमुख पदावर मराठी भाषिक व्यक्ती विराजमान झाल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
घाेरमडे यांनी पुण्याच्या खडकवासला येथील राष्ट्रीय सुरक्षा प्रबाेधिनीतून प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नेव्हल वाॅर काॅलेज आणि मुंबईतील नेव्हल वाॅर काॅलेजमधून पुढील शिक्षण पूर्ण केले. ते नाैदलात १ जानेवारी १९८४ राेजी रुजू झाले हाेते. गेल्या ३७ वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी अनेक भारतीय युद्धनाैकांवर काम केले आहे.
जी. अशाेक कुमार यांनी आपल्या कार्यकाळात नाैदलाला मिळणारी आर्थिक तरतूद वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच प्राप्त निधीचा १०० टक्के वापरही त्यांनी केला. महत्त्वाचे म्हणजे, नाैदलासाठी आत्मनिर्भर भारत माेहिमेतून अधिकाधिक स्वदेशी साहित्याची खरेदी करण्यावर भर दिला. घाेरमडे हे नेव्हिगेशन तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. आयएनएस ब्रम्हपुत्र, आयएनएस गंगा, पाणबुडी रक्षक नाैका आयएनएस निरीक्षक तसेच आयएनएस अलेप्पी या ठिकाणी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे.