संपूर्ण जग कोरोना लसीची वाट पाहत आहे, तर दुसरीकडे लस निर्मात्यांना मोठी चिंता सतावू लागली आहे. अमेरिका, इंग्लंडसह काही देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरु देखील झाले आहे. यामुळे या लसींचे अनेक साईड इफेक्ट समोर येऊ लागले आहेत. अशावेळी जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) चे सीईओ आदर पुनावाला यांना मोठ्या चिंतेने ग्रासले आहे.
कोरोना लसीच्या संभाव्य साईड इफेक्टमुळे लस बनविणाऱ्या कंपन्यांवर खटले दाखल केले जाऊ शकतात. यापासून संरक्षण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने कायदा बनविण्याची मागणी आदर पुनावाला यांनी केली आहे. कोरोना लस बनविण्यावरून लक्ष या खटल्यांकडेच वळेल अशी भीती त्यांना सतावू लागली आहे.
पुनावाला यांनी लस बनविण्यासमोरील आव्हानांवर आयोजित एका व्हर्च्युअल पॅनेल डिस्कशनमध्ये ही मागणी केली आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. पुनावाला म्हणाले की, सरकारकडे अशाप्रकारचा प्रस्ताव सादर करण्याचे काम सुरु आहे. कोरोना लस बनविणाऱ्या कंपन्यांना सर्व प्रकारची सुरक्षा देण्याची गरज आहे. सरकारने या निर्मात्यांच्या संरक्षणाची व्यवस्था करावी. COVAX आणि अन्य देशांमध्ये याबाबत चर्चाही सुरु झाली आहे, असे ते म्हणाले.
महामारी दरम्यान अशी खास सुरक्षा मिळायला हवी. लसीबाबत कथित साईडइफेक्टवर जर असे खटले दाखल होऊ लागले तर लोकांमध्ये लसीबाबत भिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने कंपन्यांना अशाप्रकारची कायदेशीर सुरक्षा दिल्याचे पुनावाला म्हणाले,.काही दिवसांपूर्वी एका वॉलिंटिअरने लसीमुळे साईडईफेक्ट झाल्याचा आरोप करत ५ कोटी रुपयांचा दावा ठोकला होता. त्याला गंभीर मेंदूसंबंधी साईडइफेक्ट झाल्याचे त्याचे म्हणणे होते. यानंतर त्या कंपनीने हा दावा फेटाळत त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.