जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दोन ठिकाणी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. शोपियान येथील ड्राच परिसरात झालेल्या पहिल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी मारले गेले. तर दुसरी चकमक सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झाली. यात शोपियानच्या मुलू परिसरात दहशतवादी ठार झाला.
दहशतवाद्याचा विशेष पोलीस अधिकारी जावेद दार यांच्या हत्येत सहभाग
या चकमकीची माहिती काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करुन दिली. या चकमकीत एक स्थानिक दहशतवादी मारला गेला. ड्राच येथील चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख हनान बिन याकूब आणि जमशेद अशी आहे.पुलवामा येथे विशेष पोलीस अधिकारी जावेद दार यांच्या हत्येत त्यांचा हात होता. या दहशतवाद्यांनी २ ऑक्टोबर रोजी जावेद दार आणि २४ सप्टेंबर रोजी पश्चिम बंगालमधील एका मजुराची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीपूर्वी जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद
पोलिसांना शोपियानच्या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. सुरक्षा दलाने परिसराला घेरल्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार झाला,सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. यात तीन दहशतवाद्यांना मारले गेले.दुसऱ्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव नसीर अहमद भट, शोपियान येथील नौपोरा बास्कुचन असे आहे. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून एक एके रायफलसह आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
अमित शाह यांच्या रॅलीपूर्वी जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जम्मू आणि राजौरी दौरा झाला. काल शाह यांची रॅली राजौरी येथे झाली. या रॅलीपूर्वी जम्मू आणि राजौरी येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. या रॅलीदरम्यान इंटरनेटचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली.
शाह यांच्या या रॅलीपूर्वी जम्मू-काश्मीरचे डीजी जेल एचके लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यांची हत्या घरातील नोकराने केल्याचा संशय आहे.