Seema Haider:पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीमा हैदरने भारतीय नागरिकत्वाची मागणी केली आहे. हेरगिरीच्या आरोपांनी वेढलेल्या सीमा हैदरने राष्ट्रपती भवनाकडे याचिका पाठवली आहे. तिच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील वकील एपी सिंग यांनी ही याचिका पाठवली असून, नागरिकत्व मिळवण्यासाठी याचिकेत पाकिस्तानी वंशाचा प्रसिद्ध गायक अदनान सामीचा हवाला दिला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती केली की, जर तिला माफी दिली तर ती आयुष्यभर पतीसोबत राहू शकेल. प्रसिद्ध गायक अदनान सामीला भारतात दीर्घकाळ राहिल्यानंतर नागरिकत्व मिळाले. त्यामुळे तिलाही नागरिकत्व मिळायला हवे. परवानगी मिळाल्यानंतर भारतात सन्मानाने राहू शकेन, असेही सीमाने याचिकेत म्हटले आहे.
6 वर्षात 4000 लोकांना नागरिकत्व मिळालेयाचिकेत सरकारी आकडेवारीचाही हवाला देण्यात आला आहे. गेल्या सहा वर्षांत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील 4 हजार नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आल्याचे सांगण्यात आले. सीमाच्या वतीने अधिवक्ता एपी सिंह यांनी याचिकेत सांगितले की, सीमा तपासात सर्व यंत्रणांना सहकार्य करत आहे. 'पाकिस्तानी गुप्तहेर' असल्याच्या आरोपावरुन ती लाय डिटेक्टर चाचणी घेण्यासही तयार आहे.
सीमा भारतात कशी आली?ऑनलाईन पबजी खेळताना सीमा आणि सचिनची ओळख झाली आणि ओळखचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर सचिनला भेटण्यासाठी सीमा आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून दुबई आणि दुबईहून नेपाळमध्ये आली. तिथे दोघांनी लग्न केले आणि नेपाळमार्गेच ती भारतात दाखल झाली. खोटी माहिती देऊन अवैधरित्या भारतात आली. भारतात आल्यानंतर तिला पोलिसांनी अट केली आणि नंतर जामिनावर तिची सुटका केली. सध्या युपी एटीएस तिची चौकशी करत आहे.
अदनान सामीला नागरिकत्व कधी मिळाले?पाकिस्तानी वंशाचा प्रसिद्ध गायक अदनान सामीला 2016 मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले. तो 13 मार्च 2001 रोजी भारतात आला होता. सुरुवातीला तो व्हिजिटर व्हिसावर भारतात आला आणि नंतर वेळोवेळी व्हिसा वाढवून घेतला. या काळात त्याने दोनदा नागरिकत्वासाठी अर्ज केला होता, पण तो फेटाळण्यात आला. अखेर पाकिस्तानचे मूळ नागरिकत्व सोडल्यानंतर त्याला भारतीय नागरिकत्व मिळाले.