नवी दिल्ली - अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी ट्र्स्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लोकसभेत केली. दरम्यान, मोदींच्या घोषणेनंतर त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, एमआयआमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची निर्मिती करण्याची घोषणा करण्यासाठी निवडण्यात आलेल्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दिल्लीतील संभाव्य पराभवाच्या धसक्याने भाजपाने राम मंदिर ट्रस्टची घोषणा घाईगडबडीत केल्याचा आरोप ओवैसींनी केला. तर काँग्रेसने भाजपावर मतांची शेती करत असल्याचा आरोप केला आहे.
ओवेसी म्हणाले की, ‘’संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ११ फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यामुळे ही घोषणा ८ फेब्रुवारीनंतर करता आली असती. मला वाटते दिल्लीती निवडणुकीच्या निकाला्च्या विचाराने भाजपा चिंतीत आहे. त्यामुळेच त्यांनी ही घोषणा केली असावी.’’
अयोध्येतील बाबरी मशीद कशी तुटली हे पुढच्या पिढ्यांना सांगू, असेही त्यांनी सांगितले. ‘’जर सर्वोच्च न्यायालयाने कारसेवेला परवानगी दिली नसती तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना बाबरी मशीद कशी पाडली गेली. हे सांगू. ज्यांनी बाबरी मशीद पाडली, त्यांच्याकडेच राम मंदिर उभारण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे. बाबरी मशिदीचा विध्वंस पुढच्या पिढ्यांना विसरू देणार नाही.
दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या दृष्टीन केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. मंदिराच्या बांधणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार ट्र्स्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केली. राम मंदिराच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टचे नाव श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट असे ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मोदींनी आज लोकसभेत दिली.
‘’आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. माझ्या नेतृत्वाखालील सरकारने रामजन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्यासाठी तसेच यासंबंधीच्या इतर विषयांवर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार एक व्यापक योजना तयार केली आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीरामजन्मभूमी ट्रस्ट या स्वायत्त ट्रस्टची स्थापना करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.’’असे मोदींनी सांगितले.