हिसार: स्वयंघोषित संत रामपालला दोन हत्या प्रकरणांमध्ये आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिसारच्या विशेष न्यायालयानं आज दुपारी रामपालला शिक्षा सुनावली. रामपालवर 4 महिला आणि एका मुलाच्या हत्येचा आरोप होता. या प्रकरणांमध्ये त्याला न्यायालयानं 11ऑक्टोबरला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर आज त्याला शिक्षा सुनावण्यात आली. रामपालसोबत त्याच्या एकूण 26 अनुयायांनादेखील दोषी ठरवण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाच्या आवारातील सुरक्षा वाढवण्यात आली होती. रामपालच्या सतलोक आश्रमात 18 नोव्हेंबर 2014 रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तर दुसऱ्या एका प्रकरणात रामपालचे भक्त पोलिसांना भिडले होते. तब्बल 10 दिवस पोलीस आणि रामपालचे भक्त यांच्यात धक्काबुकी झाली. यावेळी झालेल्या हिंसाचारात चार महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये रामपाल दोषी आढळून आला. 18 नोव्हेंबर 2014 रोजी रामपालच्या सतलोक आश्रमात एका महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. ही महिला रामपालची भक्त होती. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणीदेखील रामपालविरोधात सुरू असलेल्या इतर खटल्यांच्या सुनावणीसोबत घेण्यात आली. तर दुसरं प्रकरण 19 नोव्हेंबर 2014 चं आहे. त्यावेळी रामपालचे भक्त आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाली. यावेळी हिंसाचारदेखील झाला होता. त्यात 4 महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता.