एनडीएतून बाहेर पडल्याशिवाय सेनेला पाठिंब्याचा विचार नाही -काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 07:24 AM2019-11-09T07:24:27+5:302019-11-09T07:24:36+5:30
शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी दावा केल्यास काँग्रेसला पाठिंबा देणार काय
सुरेश भुसारी
नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडेपर्यंत शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, असे काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्यानंतर काँग्रेसचे सर्व आमदार जयपूरमध्ये गेले आहेत. अविनाश पांडे हे काँग्रेसचे राजस्थानचे प्रभारी आहेत. काँग्रेसच्या आमदारांना जयपूरला घेऊन जाण्यासाठी पांडे प्रयत्न करीत आहेत.
शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी दावा केल्यास काँग्रेसला पाठिंबा देणार काय? यावर ते म्हणाले की, शिवसेना केंद्रातील सरकारमध्ये आहे. एनडीए सरकारचा शिवसेना घटक पक्ष आहे. एनडीएमधून शिवसेना बाहेर पडेपर्यंत सेनेला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रात सेना सरकार स्थापन करण्यासाठी गंभीर असल्याचे स्पष्ट होईल, असेही पांडे यांनी सांगितले.