नवी दिल्ली - सध्या देशातील वातावरण संवेदनशील असल्यामुळे तसेच लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने सत्ताधारी भारतीय जनता पार्टी कोणतीच जोखीम घेण्यास तयार नाही. भारत-पाकिस्तान संघर्ष, एअर स्ट्राईक, राफेल अशा संवेदनशील विषयांवर पक्षाची योग्य बाजू मांडण्यासाठी भाजप गंभीरतेने विचार करत आहे. याचसाठी माध्यमांसमोर पक्षाची बाजू मांडणाऱ्या प्रवक्त्यांचा क्लास भाजपचे ज्येष्ठ नेते घेत आहेत. पक्ष कार्यालयात प्रत्येक दिवशी दुपारी 3 वाजता या प्रवक्त्यांचा क्लास घेतला जातो.
माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चा, त्या चर्चासत्रात सहभागी असणारे विरोधी नेते, तज्ज्ञमंडळी यांच्याशी गंभीर विषयांवर बाजू मांडताना सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांची दमछाक होताना पाहायला मिळते, कधीकधी असे विषय समोर येतात ज्यामध्ये पक्षाची भूमिका मांडताना प्रवक्त्यांच्या नाकीनऊ येतात. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एखाद्या गंभीर विषयांवर पक्ष प्रवक्त्यांनी कशारितीने पक्षाची तसेच सरकार बाजू मांडावी याचे प्रशिक्षण दिले जात आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आगामी लोकसभा निवडणुका संपेपर्यंत सुरुच राहणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दिल्ली येथे भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांचा क्लास घेतला. यामध्ये देशात सध्या सुरू असणाऱ्या विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका काय आहे, ती माध्यमांसमोर कशी मांडली पाहीजे याबाबत मार्गदर्शन केले. भारत-पाकमधील गंभीर मुद्द्यांवर बोलताना कशापद्धतीचे गांभीर्य राखलं पाहीजे या सूचना दिल्या गेल्या.
एवढचं नव्हे तर सहकार, आर्थिक, सामाजिक, राष्ट्रीय, राज्य आणि शहरे अशा वेगवेगळ्या समस्यांवर बोलण्यासाठी त्या त्या विषयांतील जाणकार मंडळी अशा प्रवक्त्यांना माध्यमांतील चर्चेसाठी पाठवले पाहीजे. या बैठकीत पक्षाच्या प्रवक्त्यांसोबतच केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरही सहभागी होते.
तसेच आगामी काळात केंद्र सरकारचे ज्येष्ठ मंत्रीदेखील पक्षाची चांगली बाजू मांडण्यासाठी, सरकारच्या कालावधीत घेतलेले लोकपयोगी निर्णय, विकासकामांचा लेखाजोखा याबाबत आकडेवारी घेऊन माध्यमांसमोर जातील. तसेच या ज्येष्ठ नेत्यांच्या व्यस्त दिनक्रमात व्यत्यय येऊ नये साठी समन्वयकाची नेमणूक करण्याबाबतही विचार करण्यात येत आहे.
विरोधी पक्षांच्या आरोपांचे खंडन करण्याची मोठी जबाबदारी प्रवक्त्यांवर असते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकींसाठी भारतीय जनता पार्टीने या प्रवक्त्यांचा क्लास घेऊन योग्य ती खबरदारी घेतल्याचे दिसून येते.