फुटीरतावादी नेता यासीन मलिक दोषी; दहशतवाद्यांना पैसा पुरविला, आजन्म कारावासाची शिक्षा शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 05:31 AM2022-05-20T05:31:40+5:302022-05-20T05:32:43+5:30
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिच्या अपहरणातही मलिकचा हात होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याप्रकरणी काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासीन मलिक याला दिल्लीतील विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्याला द्यावयाच्या शिक्षेसंदर्भात २५ मे रोजी न्यायालयात युक्तिवाद होणार आहे. त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये यासीन मलिकवर गुन्हे दाखल करून त्याच्यावर हा खटला चालविण्यात आला होता.
जेकेएलएफमध्ये होता सक्रिय
- मलिक सक्रिय सदस्य असलेल्या जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या संस्थेवर केंद्राने बंदी घातली आहे.
- १९९० मध्ये हवाई दलाच्या ४ जवानांची हत्या केल्याचा तसेच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिच्या अपहरणातही मलिकचा हात होता, असेही त्याच्यावर आरोप आहेत.
हाफिज सईदवरही आरोपपत्र दाखल : लष्कर-ए-तय्यबाचा संस्थापक हाफिज सईद, हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन यांच्यासह काश्मीरमधील फुटीरतावादी नेते फारुक अहमद दार, शब्बीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह आदींवरही न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.