१२ जणांची हत्या करणाऱ्या 'सिरियल किलर'चा पोलिस कोठडीत मृत्यू; आजी-आईलाही संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 02:22 PM2024-12-09T14:22:40+5:302024-12-09T14:27:49+5:30
गुजरातमध्ये १२ जणांची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Gujarat Crime : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमध्ये एका व्यावसायिकाच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ४२ वर्षीय तांत्रिकाचा रविवारी पोलिस कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी साणंद परिसरात व्यावसायिकाची हत्या करण्यापूर्वी एका तांत्रिकाला पकडले होते. एका टॅक्सी चालकासोबत रात्री तांत्रिक म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील तीन लोकांसह एकूण १२ जणांची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या तांत्रिकाने साणंद येथील व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात अडकवले होते. तांत्रिक विद्याच्या माध्यमातून चौपट रक्कम देऊ, असे आश्वासन त्याने दिले होते. मात्र तांत्रिकाने व्यावसायिकाची हत्या करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली होती.
नवलसिंह चावडा असे या तांत्रिकाचे नाव होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिकाने कबुली दिली आहे की त्याने १२ लोकांना केमिकलयुक्त पेय देऊन त्यांची हत्या केली होती. सरकेज पोलिसांनी नवलसिंह चावडा याला ३ डिसेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास अटक केली होती. तांत्रिकच्या टॅक्सी व्यवसायातील भागीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी चावडाची चौकशी करण्यासाठी १० डिसेंबरला पहाटे ३ वाजेपर्यंत पोलीस कोठडी मिळवली होती. मात्र रविवारी सकाळी दहाच्या सुमारास चावडा याची प्रकृती खालावली आणि त्याला रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
यापूर्वी चौकशीदरम्यान आरोपी नवलसिंह चावडा याने १२ खून केल्याची कबुली दिली होती. सर्वांचा मृत्यू एक द्रव्य प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. आरोपीने एकूण १२ खून केल्याची कबुली दिली होती. यामध्ये त्याने अहमदाबादमध्ये एक तर सुरेंद्र नगरमध्ये सहा खून केले. यामध्ये आरोपीच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश होता. नवलसिंहने आई, पत्नी आणि काकांची हत्या केली. तसेच नवलसिंहने राजकोटमध्ये तीन तर कच्छच्या वांकानेर आणि अंजारमध्ये प्रत्येकी एक खून केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चावडा हा कॅब सर्व्हिस चालवायचा. यासोबत त्याने एक यूट्यूब चॅनेलही तयार केले होते. यामध्ये तो तंत्रविद्या सांगायचा. त्याने साणंदमधील एका व्यावसायिकाला मारण्याची योजना आखली होती. पण कॅब सर्व्हिसमधील जिगर गोहिल आणि त्याचा सहकारी यांच्यामुळे तो पकडला गेला. तांत्रिक नवलसिंह चावडा याने १३ व्या हत्येसाठी अभिजीत सिंग राजपूत याला लक्ष्य केले होते.
आरोपीने १४ वर्षांपूर्वी आजी आणि वर्षभरापूर्वी आई आणि काकांची अशाच पद्धतीने हत्या केली होती. चावडा याने त्यांच्या मूळ गावी सुरेंद्रनगर येथील प्रयोगशाळेतून ड्राय क्लीनिंगमध्ये वापरण्यात येणारे सोडियम नायट्रेट हे रसायन विकत घेतले होते. आरोपी कथित धार्मिक विधी दरम्यान पाण्यात विरघळलेले सोडियम नायट्रेट प्यायला द्यायचा. यातील अनेकांचा मृत्यू विषामुळे हृदयविकाराच्या झटक्याने झाला, तर काहींच्या मृत्यूचे कारण तपासाचा विषय असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
चावडाला या रसायनाबाबत दुसऱ्या तांत्रिकाकडून कळले होते. त्याचा परिणाम हे रसायन प्यायल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी दिसून यायचा आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू व्हायचा. आरोपी स्वतःला भुवाजी म्हणवून घेत असे आणि त्याच्यात जादू आणि चमत्कार करण्याची ताकद असल्याचा दावा करत आसे. सुरेंद्रनगरच्या वाधवण येथे त्याचा आश्रम असून तेथे तो काळी जादू करत असे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी चावडाच्या गाडीतून धार्मिक विधी आणि पांढऱ्या पावडरसह काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.