आमचं लक्ष्य एकच! सीरम, भारत बायोटेककडून वादावर पडदा; संयुक्त निवेदन प्रसिद्ध
By कुणाल गवाणकर | Published: January 5, 2021 03:43 PM2021-01-05T15:43:58+5:302021-01-05T15:44:34+5:30
भारतासह जगाला कोरोना लसींचा सुरळीत पुरवठा करण्यास कटिबद्ध; दोन्ही कंपन्यांचं संयुक्त निवेदन
मुंबई: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या कोरोना लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाल्यानंतर दोन्ही संस्थांकडून एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीका होत होती. लसीची परिणामकारकता आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही संस्था एकमेकांना लक्ष्य करत होत्या. मात्र आता या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही संस्थांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत याबद्दलची माहिती दिली आहे.
भारताला आणि जगाला कोरोनावरील लसी लवकर उपलब्ध व्हाव्यात यासाठी दोन्ही कंपन्या एकत्रितपणे काम करतील, अशी माहिती संयुक्त निवेदनातून देण्यात आली आहे. 'भारताला आणि जगाला कोरोनावरील लसी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक कटिबद्ध आहे,' असं दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात नमूद केलं आहे. दोन्ही कंपन्या एकत्र येऊन लसीच्या उत्पादन आणि वितरणावर काम करतील, असा इरादादेखील निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.
We are fully aware of the importance of vaccines for people and countries alike, we hereby communicate our joint pledge to provide global access for our COVID-19 vaccines: Joint statement of Serum Institute of India and Bharat Biotech
— ANI (@ANI) January 5, 2021
'भारत आणि जगभरातील लोकांचे जीव वाचवण्याचं मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. लसी या जगभरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. लोकांचं आयुष्य वाचवण्याची आणि अर्थचक्राचा गाडा रुळावर आणण्याची क्षमता लसींमध्ये आहे. उत्तम दर्जाच्या, सुरक्षित आणि प्रभावी लसींची निर्मिती, पुरवठा आणि वितरण यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे,' असं दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात पुढे म्हटलं आहे.
'दोन्ही कंपन्या लसींच्या उत्पादनावर आणि वितरणावर काम करत आहेत. कोरोना लसींचा सुरळीत पुरवठा करणं याला आम्ही देशाप्रती आणि जगाप्रती असलेलं कर्तव्य समजतो. आम्ही नियोजनानुसार हे काम सुरूच ठेवू. नागरिकांसाठी कोरोना लस किती महत्त्वाची आहे, याची जाणीव आम्हाला आहे. संपूर्ण जगाला कोरोना लस पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,' असं सीरम आणि भारत बायोटेकनं म्हटलं आहे.