सात गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले, आयटीबीपीकडून शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 06:31 AM2019-06-24T06:31:07+5:302019-06-24T06:31:34+5:30
उत्तराखंडमधील नंदादेवी पूर्व शिखराचा माथा सर करण्याच्या मोहिमेवर निघालेल्यांपैकी सात गिर्यारोहकांचे मृतदेह इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) जवानांच्या पथकाने शोधून काढले आहेत. हे गिर्यारोहक तीन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाले होते.
पिठोरगढ : उत्तराखंडमधील नंदादेवी पूर्व शिखराचा माथा सर करण्याच्या मोहिमेवर निघालेल्यांपैकी सात गिर्यारोहकांचे मृतदेह इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) जवानांच्या पथकाने शोधून काढले आहेत. हे गिर्यारोहक तीन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाले होते.
आयटीबीपीच्या दहा जवानांच्या पथकाने बर्फाखाली दबलेले सात गिर्यारोहकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतांमध्ये एका महिला गिर्यारोहकाचाही समावेश आहे. नंदादेवी पूर्व शिखराच्या मोहिमेवर आठ गिर्यारोहक गेले होते. त्यामुळे आणखी एका गिर्यारोहकाच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. हिमस्खलनामध्ये सापडून हे गिर्यारोहक मरण पावले आहेत.
दिल्लीतील हिमालयन रन अँड ट्रेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत नंदादेवी पूर्व शिखराचा माथा सर करण्याची ही मोहिम आखण्यात आली होती. त्यात १२ सदस्य होते. इंग्लंडचे तीन, अमेरिकेचे तीन, आॅस्ट्रेलियाचा एक गिर्यारोहक, एक भारतीय लाइजन आॅफिसर, चार पोर्टरचा यांचा त्यात समावेश होता. या पथकाचे सामान नंदादेवी पूर्व शिखराच्या तळछावणीपर्यंत अन्य १६ पोर्टरनी पोहोचविले होते. या गिर्यारोहकांनी १३ मे रोजी मुनस्यारी येथून नंदादेवी शिखराच्या तळछावणीकडे प्रस्थान केले. हे गिर्यारोहक बेपत्ता झाल्याची माहिती ३१ मे रोजी जिल्हा प्रशासनाला मिळाली.
खराब हवामानामुळे अडथळे
बेपत्ता गिर्यारोहकांचा थांगपत्ता लावण्यासाठी आयटीबीपीने डेअरडेव्हिल ही शोधमोहिम हाती घेतली होती. त्यामध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचीही
मदत घेण्यात येत आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरही घटनास्थळी पोहोचू शकत नव्हते.