नवी दिल्लीः २६ जुलै म्हणताच मुंबईकरांच्या डोळ्यापुढे तरळतो तो जलप्रलयाने उडवलेला हाहाकार. २००५ साली याच दिवशी मुंबईवर आभाळ फाटलं होतं आणि त्यात अनेक संसार मोडून पडले होते. आज या घटनेला १३ वर्षं पूर्ण होत असताना आणि मुंबईकर त्या आठवणीने धास्तावला असताना, दिल्ली-एनसीआरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाला नाहक जीव गमवावा लागला आहे.
इंदिरापूरम येथे क्षिप्रा सनसिटी भागात ही दुर्दैवी घटना घडली. सकाळी मुसळधार पाऊस पडत असताना, सूरज कांडा हा तरुण आपल्या मुलीला शाळेत सोडायला जात होता. त्यावेळी चालता-चालता पाय विजेच्या उघड्या तारेवर पडल्यानं शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. विद्युत विभागाने पावसाळ्याआधी आपलं काम पूर्ण केलं असतं, तर ही दुर्घटना टळू शकली असती, अशी नाराजी आणि चीड स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.
त्याशिवाय, गाझियाबादमध्ये खोरा भागात इमारतीचा भाग पडून १० वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. ग्रेटर नोएडामध्ये तीन मजली बंगल्याचा भाग कोसळला. सुदैवानं, संपूर्ण कुटुंब सुखरूप आहे. इंदिरापूरमजवळ रस्ता खचल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.