नवी दिल्ली : काश्मीरबाबत सतत आपलं मत मांडणाऱ्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे. आपल्या लोकांना सांभाळताना पाकिस्तानला नाकीनऊ येत आहेत, तिथे काश्मीर काय सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित करत शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानमध्ये नवा वाद उपस्थित केला आहे. एका पत्रकार परिषदेत शाहिद आफ्रिदीनं हे विधान केलं होतं. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शाहिद आफ्रिदीचं म्हणणं योग्यच असल्याचं म्हटलं आहे. राजनाथ सिंह म्हणाले, शाहिद आफ्रिदीचं म्हणणं योग्य आहे. त्यांना पाकिस्तान सांभाळता येत नाही. काश्मीर काय सांभाळणार? काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि तो राहणारच.
शाहिद आफ्रिदीनं काश्मीरबाबत वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा आफ्रीदीनं आपल्या वक्तव्यातून भारतावर टीका केली होती. यावर्षी एप्रिल महिन्यात भारतीय लष्करानं ठार मारलेल्या 13 दहशतवाद्यांबाबत शाहिद आफ्रिदीनं सहानुभूती व्यक्त केली होती. त्यानंतर भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर, राजकीय नेते आणि मान्यवरांनी आफ्रिदीच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.