नवी दिल्ली- भाजपाचे खासदार आणि नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आरबीआयचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आरबीआयचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आपल्या पदाचा दुरुपयोग करू शकतात, अशीही भीती सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केली आहे. शक्तिकांत दास यांनी अनेक न्यायालयीन प्रकरणात माजी अर्थमंत्री चिदंबरम यांचा वाचवण्याचा प्रयत्न केला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्रही लिहिलं आहे. 1980च्या बॅचही माजी आयएएस अधिकारी शक्तिकांत दास यांची मंगळवारी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. नोटाबंदीचा प्रभाव जनतेवर पडू नये, यासाठी शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. ऊर्जित पटेल हे कार्यकाळ अपुरा ठेवलेले 1990नंतरचे रिझर्व्ह बँकेचे दुसरे गव्हर्नर ठरले आहेत. या आधी रघुराम राजन यांनी केंद्र सरकारने दिलेली मुदतवाढ नाकारली होती. तर एस. वेंकटरामन यांनीही आपली मुदत संपण्याआधी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता.ऊर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे 24वे गव्हर्नर होते. ब्रिटिशांनी 1935मध्ये या बँकेची स्थापना केली. त्यावेळी ‘गव्हर्नर-जनरल’ हे बँकेचे प्रमुख होते. बँकेचे पहिले दोन प्रमुख ब्रिटिश होते. त्यानंतर 1949मध्ये बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्यावेळी बँकेचे प्रमुखपद ‘गव्हर्नर’ म्हणून निश्चित झाले. 1992च्या उदारीकरणापर्यंत बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा निश्चित करण्यात आला होता. उदारीकरणानंतर या पदाचा कार्यकाळ पाच वर्षे इतका करण्यात आला. नियुक्ती करताना पहिली तीन वर्षांची व त्यानंतर दोन वर्षांची मुदतवाढ, असे सूत्र ठरले. त्यामध्ये एस. वेंकटरामन (2 वर्षे), रघुराम राजन (3 वर्षे) व आता ऊर्जित पटेल (2 वर्षे 97 दिवस) यांनी तिघांनीही हा कार्यकाळ पूर्ण केला नाही. ऊर्जित पटेल हे १९९० नंतर सर्वात कमी काळ राहिलेले गव्हर्नर ठरले आहेत.