सुरत - गुजरातमध्ये लॉकडाऊन काळात संचारबंदी असतानाही वडिलांची गाडी घेऊन बिनधास्त फिरणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या मुलास महिला पोलीस अधिकाऱ्याने चांगलाच धडा शिकवला. मात्र, या धाडसी कार्याबद्दल सुनिता यादव यांचे कौतुक करण्याऐवजी, त्यांना पुरस्कार देण्याऐवजी त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागतोय, ही अतिशय गंभीर बाब आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत ही लाजीरवाणी घटना असल्याचं म्हटलंय.
गुजरातच्या वरछा येथे आरोग्य राज्यमंत्री कुमार कानाणी यांचा मुलगा प्रकाश आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनिता यादव यांच्यात चांगलीचा बाचाबाची झाली. राज्यमंत्र्यांच्या मुलाने वडिलांच्या पॉवरचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, लॉकडाऊन काळात वडिलांची नेमप्लेट असलेली गाडी घेऊन रस्त्यावर फिरत असल्यामुळे सुनिता यांनी त्यास चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर, थेट आरोग्यमंत्र्यांनाही सुनिता यांनी कायदा हा सर्वाना समान असल्याचे सांगत माझं कर्तव्य करत असल्याचे म्हटले. त्यामुळे, त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ही लज्जास्पद घटना असल्याचे म्हटले.