नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा देशाच्या राजकारणात वेगळाच दबदबा आहे. सत्तेत असो किंवा विरोधात पण शरद पवारांचे नाव येताच सर्वजण आदरपूर्वक त्यांचा मान राखतात. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जाहीर कार्यक्रमात शरद पवारांचं कौतुक केलं आहे. आता, शरद पवारांनी राजधानी दिल्लीत जाऊन लोकसभा अध्यक्षांची एक भेट घेतली आणि राष्ट्रवादीच्या खासदारांची गेलेली खासदारकी परत मिळाली. अर्थात, हे सगळं कायद्यानुसारच झालं, पण पवारांच्या पॉवरची सर्वांनाच प्रचिती आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदार अशी ओळख असलेले लक्षद्वीपचे मोहम्मद फैजल यांना खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला होता. त्यानंतर, फैजल यांचे ११ जानेवारीपासून लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती लोकसभा सचिवालयाने दिली. फैजल यांनी या शिक्षेविरोधात केरळ उच्च न्यायालयात धावही घेतली होती. याच, केरळ कोर्टाच्या निर्णयाचा दाखल देत फैजल यांना पुन्हा खासदारकी परत मिळाली आहे.
शरद पवार यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत मोहम्मद फैजल यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागं घेण्याची मागणी केली. केरळ उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा दाखलाही यावेळी पवारांनी दिला. केरळ उच्च न्यायालयानं मोहम्मद फैजल यांना सुनावण्यात आलेली शिक्षा रद्द केल्याचं सांगत लोकसभा अध्यक्षांना बडतर्फीच्या कारवाईचा फेरविचार व्हावा, अशी विनंती शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर, बडतर्फीची ही कारवाई रद्द करण्यात आली असून येथील पोटनिवडणूकही रद्द झाल्याची माहितीही केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली.
काय आहे प्रकरण
सन २००९ साली हे प्रकरण घडले होते. खासदार फैजल यांच्यासह तीन जणांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, चार आरोपींना कोर्टाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. फिर्यादीनुसार, खासदाराने कथितपणे लोकांच्या गटाचे नेतृत्व केले आणि वादानंतर माजी केंद्रीय मंत्री पी. एम. सईद यांचे जावई मोहम्मद सलिया यांना गंभीर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फैजल आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. काँग्रेस नेते मोहम्मद सलिया यांना नंतर केरळला नेण्यात आले आणि त्यांच्यावर अनेक महिने खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या खटल्यात एकूण ३२ आरोपी होते आणि पहिल्या चार जणांना शिक्षा झाली होती. खासदार हे या प्रकरणातील दुसरे आरोपी होते. मात्र, ही किरकोळ बाचाबाची असल्याचे आरोपींच्या वकिलांनी ठामपणे सांगितले.