“संसदेत महात्मा गांधींच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो कशासाठी?”: शशी थरूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 08:21 AM2021-10-10T08:21:46+5:302021-10-10T08:26:14+5:30
वीर सावरकर नेमके कोण होते, ते स्वातंत्र्यसैनिक होते, हिंदूत्ववादी नेते होते की, मुस्लिम विरोधी होते, असे सवाल उपस्थित करण्यात आले.
नवी दिल्ली: संसदेतमहात्मा गांधीजींच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तसबीर कशासाठी लावली आहे, ही बाब अनेकांच्या समजण्यापलीकडे आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना इतिहासकार विक्रम संपत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांशी निगडीत अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या. यावेळी शशी थरूर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. याला विक्रम संपत यांनी उत्तरे दिली.
वारसा, इतिहास आणि अभिमान या विषयावर चर्चा सुरू असताना वीर सावरकर नेमके कोण होते, ते स्वातंत्र्यसैनिक होते, हिंदूत्ववादी नेते होते की, मुस्लिम विरोधी होते, असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना विक्रम संपत यांनी म्हटले की, वीर सावरकर या सर्वांचे एक मिश्रण होते. यावर शशी थरूर म्हणाले की, विक्रम संपत यांचा सावरकरांवरील अभ्यास दांडगा आहे. विक्रम संपत यांची दोन्ही पुस्तके वाचली नाहीत, कारण ती वाचायला वर्ष लोटेल, अशी मिश्लिक टिप्पणी शशी थरूर यांनी केली.
महात्मा गांधींच्या शेजारी वीर सावरकरांची तसबीर कशासाठी?
देशातील एक गट असा आहे की जो स्वातंत्र्यवीर सावरकरांना राष्ट्रवादी या नात्याने पाहतो. तर दुसरा गट सावरकरांना इंग्रजांकडे याचिका करणारा, इंग्रजांकडून पेंशन घेणारा माणूस म्हणून पाहतो. त्यामुळे आमच्यातील काही जणांना ही बाब समजणे कठीण आहे की, संसदेत महात्मा गांधी यांच्या शेजारी वीर सावरकर यांची तसबीर कशासाठी लावली आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले. यावर विक्रम संपत म्हणाले की, ज्या विनंती किंवा याचिकांची गोष्ट केली जाते, त्या वास्तविक सावरकर यांच्या दया याचिका नव्हत्या. तसेच पेंशनबाबत बोलायचे झाले तर ते अन्य अनेक स्वातंत्रसैनिकांना मिळत असे. ज्यांची पदवी इंग्रज सरकार काढून घेत असे. इंग्रज मानत होते की, वीर सावरकर, भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, दुर्गा भाभी, राज बिहारी बोस एकमेकांच्या संपर्कात होते, म्हणूनच त्यांची ५ वर्षांची शिक्षा १३ वर्षे करण्यात आली.
दरम्यान, या चर्चेवेळी पंतप्रधान मोदींनी १४ ऑगस्ट फाळणीचा दिवस स्मरण दिवस म्हणून मानला जाईल, अशी घोषणा केली होती. यावर बोलताना थरूर म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांची ही गोष्ट चुकीची आहे, ते आम्हाला पटलेले नाही. याला उत्तर देताना विक्रम संपत म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी योग्य गोष्ट केली आहे. ही चांगली बाब आहे. कारण, इतिहास लक्षात ठेवला की, कोणत्या गोष्टींची, घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, हे माणसाच्या कायम स्मरणात राहते. इंडिया टुडेच्या कॉन्लेव्ह २०२१ मध्ये यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.