नवी दिल्ली - माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यानंतर अब्दुल्ला यांनी राज्यातील जनतेला शांत राहण्याचं आवाहन केलं. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये वेगाने घडामोडी घडत आहेत. तसेच काश्मीरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सध्या जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद आहे. मात्र त्याआधी नजरकैदेत असलेल्या अब्दुल्ला आणि मुफ्तींनी ट्विट्स केली आहेत.
काँग्रेसचे नेते शशी थरूर हे मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवल्यामुळे संतापले आहेत. मोदी सरकारचं हे चाललंय काय? अशी प्रतिक्रिया थरूर यांनी दिली आहे. तसेच ओमर अब्दुल्ला तुम्ही एकटे नाही असं म्हणत त्यांना पाठिंबा दिला आहे. लोकशाही मानणाऱ्या प्रत्येक माणसाने ओमर अब्दुल्ला यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे असं थरूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
'ओमर अब्दुल्ला तुम्ही एकटे नाही. लोकशाहीवर विश्वास असणारा प्रत्येक भारतीय तुमच्या पाठिशी उभा असेल. संसदेचं सत्र सुरू आहे. आमचा आवाज रोखला जाऊ शकत नाही', असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारच्या काश्मीरसंदर्भातील भूमिकेवर टीका केली आहे. 'जम्मू काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना नजरकैदेत ठेवणं यातूनच लोकशाही उद्दिष्टांची पायमल्ली होणार असल्याचं स्पष्ट आहे. नजरकैद घटनेचा मी निषेध करतो' असं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची उणीव जाणवत असल्याचं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 'भाजपामध्ये असून देखील अटल बिहारी वाजपेयी यांना काश्मिरी जनतेविषयी सहानुभूती होती. त्यांनी काश्मीरमधील जनतेचे प्रेम कमावले होते. आज त्यांची खूप जास्त उणीव जाणवत आहे.' असं ट्वीट मुफ्ती यांनी केलं आहे.
संपूर्ण राज्यात सुरक्षेच्या यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. लखनपूरपासून काश्मीरच्या घाटीपर्यंत प्रत्येक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नजर ठेऊन आहेत. मीडिया रिपोर्टनुसार आतापर्यंत काश्मीरमध्ये जवानांच्या 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद आहे. मात्र त्याआधी नजरकैदेत असलेल्या अब्दुल्ला आणि मुफ्तींनी ट्विट्स केली. लवकरच इंटरनेट सेवा खंडित होणार असल्याचं समजतं आहे. संचारबंदीदेखील लागू केली जात आहे. काय होणार आहे, अल्लाह जाणे. एक मोठी रात्र सुरू होत आहे. या कठीण काळात आपण सोबत राहायला हवं आणि जे होईल त्याचा एकत्रितपणे सामना करायला हवा, असं मुफ्तींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं. मुफ्तींचं हे ट्विट ओमर अब्दुल्लांनी रिट्विट केलं आहे.