लाल बहादूर शास्त्रीजींनीही घेतले होते पीएनबीचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 05:11 AM2018-02-22T05:11:12+5:302018-02-22T05:18:33+5:30
पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी कारसाठी घेतलेले पाच हजार रूपयांचे कर्ज त्यांच्या निधनानंतर पत्नी ललिता यांनी निवृत्तीवेतनातून परत केले होते. ही माहिती त्यांचे चिरंजीव अनिल शास्त्री यांनी दिली.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेकडून घेतलेले कित्येक करोडोंचे कर्ज नीरव मोदी परत करेल की नाही हे माहीत नाही, पण या बँकेकडून दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी कारसाठी घेतलेले पाच हजार रूपयांचे कर्ज त्यांच्या निधनानंतर पत्नी ललिता यांनी निवृत्तीवेतनातून परत केले होते. ही माहिती त्यांचे चिरंजीव अनिल शास्त्री यांनी दिली.
अनिल शास्त्री म्हणाले की, आम्ही सेंट कोलंबिया शाळेत टांग्यातून गेलो. फक्त एकदाच आम्ही कार्यालयाची कार वापरली. कोणत्याही खासगी कामासाठी कार वापरायला माझ्या वडिलांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे आम्ही कार विकत घ्यावी, अशी घरच्यांची इच्छा होती. ते म्हणाले की, १९६४ मध्ये पंतप्रधानांचे विशेष सहायक व्ही. एस. वेंकटरामन यांनी केलेल्या चौकशीतून नव्या फियाट कारची किमत १२ हजार रूपये असल्याचे शास्त्री कुटुंबीयांना समजले. कुटुंबाकडे बँकेत सात हजार रूपयेच होते. त्यामुळे पंतप्रधानांनी पाच हजार रूपये कर्जासाठी अर्ज केला व ते मंजूरही झाले. मात्र ११ जानेवारी, १९६६ रोजी शास्त्री यांचे ताश्कंदमध्ये निधन झाले. नंतर ते कर्ज तसेच राहिले. वडिलांच्या निधनामुळे माझ्या आईने त्याची परतफेड पेन्शनमधून केली होती.
ती कार (क्रमांक डीएलई ६) १९६४ च्या मॉडेलची होती. आता ही कार लाल बहादूर शास्त्री स्मारकात ठेवण्यात आली आहे. पंजाब
नॅशनल बँकेची स्थापना १८९४ मध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत स्वदेशी
बँक हवी, या उद्देशाने झाली
होती. सुरुवातीला बँकेच्या संचालकांत लाला लजपत राय
होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे मोठे योगदान होते.