जयपूर : वडिलांच्या पश्चात आईने नोकरी करून मुलांचा, मुलींचा सांभाळ केला, त्यांची लग्न लावून दिली, अशा घटना नेहमीच पाहण्यात, ऐकण्यात आणि वाचनात येत असतात. पण जयपूरमध्ये एका मुलीने आपले वडील वारल्यानंतर निराशेत सापडलेल्या आईचा विवाह लावून दिला.जयपूरमध्ये राहणारे मुकेश गुप्ता यांचे २0१६ साली हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे पत्नी श्रीमती गीता सतत नैराश्यात जात. त्या एका शाळेत नोकरी करतात. तरीही पतीच्या विरहाने त्या खचूनच गेल्या होत्या. त्यातच मुलगी संहिता हिला गेल्या वर्षी मार्चमध्ये गुरगाव येथे नोकरी लागली आणि ती तिथे गेली. तेव्हापासून आपण आता एकटे पडलो आहोत, असे श्रीमती गीता यांना वाटत होते.सुटीच्या दिवशी न चुकता संहिता आईला भेटायला येत असे. ते एक-दोन दिवस काहीसे आनंदात जात. पण ती परतताच त्या पुन्हा निराश होत. आपण आईला सोडून आल्याचं दु:ख संहितालाही होतं. पण नोकरी सोडणंही तिला शक्य नव्हतं. त्यामुळे गेल्या आॅगस्टमध्ये संहिताने आपल्या आईसाठी जोडीदार शोधण्याचा निर्णय घेतला. आयुष्यात प्रत्येकाला जोडीदार हवा असतो. प्रत्येक गोष्ट मुलांना सांगणं शक्य नसतं, हे संहितालाही कळत होतं.मग तिनं मॅट्रिमोनिअल संकेतस्थळावर मोबाइल क्रमांक दिला. पण असे आपण केले आहे, हे तिने आईला सांगितले सप्टेंबरमध्ये. ते ऐकून आईला धक्काच बसला. पण संहिताने आईची समजूत घातली. आपली मुलगी वेडीच आहे, आपण ५३ व्या वर्षी लग्न करणार नाही, असं गीता म्हणत होत्या. कुटुंबातील कोणालाच संहिताची कल्पना मान्य झाली नाही. तरीही संहिता आपल्या भूमिकेवर ठाम राहिली.आॅक्टोबरमध्ये ५५ वर्षे वयाच्या के. जी. गुप्ता या महसूल निरीक्षकाने संपर्क साधला. त्यांची पत्नी २0१0 साली कर्करोगाने वारली होती. त्यांना दोन मुले असल्याने त्यांनीहीपुन्हा लग्नाचा विचार केला नव्हता. संहिता त्यांना भेटली, तिनं त्यांची आणि आईची भेट घालून दिली. अनेक वेळा चर्चा केल्यानंतर ही व्यक्ती चांगली असल्याची तिची आणि आईची खात्री पटली. त्यानंतर गीता आणि गुप्ता यांचा संहिताने विवाह लावून दिला. (वृत्तसंस्था)आई आता सुंदर दिसतेवडील वारल्यापासून खचलेली आई आता आनंदात दिसू लागली आहे. तिची तब्येत सुधारली आहे आणि ती आता पुन्हा सुंदर दिसू लागली आहे. मला हाच आनंद पाहायचा होता, असं संहिता म्हणते.
तिने लावून दिला निराश आईचा विवाह; पती वारल्याने गेल्या होत्या खचून, मॅट्रिमोनिअल संकेतस्थळाद्वारे घडवून आणली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:58 PM