श्रीनगर, दि. 15 - देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असला तरी काश्मीरमधील श्रीनगर येथे मात्र या दिवशी तणावाचे वातावरण असते. फुटीरतावादी संघटना आणि दहशतवादी यांच्या धमक्यांमुळे येथील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या लाल चौक परिसरात राष्ट्रध्वज फडकावणेही सुरक्षा दलांसमोरील आव्हान ठरते. मात्र ही दहशत झुगारत एका महिलेने लाल चौकात वंदे मातरम्, भारत माता की जय च्या घोषणा देत हा परिसर दणाणून सोडला. या महिलेने धैर्य दाखवत केलेल्या या कृतीचा व्हीडिओ आाता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वातंत्र दिनी होणाऱ्या दहशतावादी कारवाया विचारात घेऊन लष्काराकडून काश्मीरमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येते. त्यात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या श्रीनगरमधील लाल चौक परिसरात तर संचारबंदी लागू केली जाते. मात्र अशा परिस्थितीत ही महिला तेथे वंदे मातरमच्या घोषणा देताना दिसत आहे. तसेच ती तेथे पहाऱ्यावर तैनात असलेल्या जवानांनाही अशा घोषणा देण्यासाठी आवाहन करत आहे. मात्र अघटित होऊ नये म्हणून सुरक्षा दलांकडून त्या महिलेला तेथून बाहेर काढण्यासाठी धावपळ करावी लागल्याचेही दिसत आहे. लाल चौक परिसरामध्ये फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. त्यामुळे येथे नेहमीच तणावाची परिस्थिती असते. येथे 1948 साली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकावला होता. त्यानंतर 1992 साली भाजपाचे तात्कालिन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी येथे तिरंगा फडकवला होता.
काश्मीरमध्ये तिरंगा यात्रेसाठी निघालेल्या 200 भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक स्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी तिरंगा यात्रेत सामील झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यातील तणावाची परिस्थिती पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. भाजपाच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्याक्ष अैजाझ हुसैन यांच्यासह काही कार्यकर्त्यांना सोमवारी रात्री अटक केली. तर अबी गुलजार यांच्यासह काही जणांना आज सकाळी ताब्यात घेतले असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 200 भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचे समजते. याचबरोबर येथील मोबाईल इंटरनेट सेवा प्रशासनाकडून स्थगित करण्यात आली आहे.