“काश्मीर गाझा बनले नाही याचे सगळे श्रेय पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांनाच जाते”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 10:39 AM2023-11-15T10:39:02+5:302023-11-15T10:40:51+5:30
जम्मू काश्मीरमधील बदललेल्या परिस्थितीचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाते, या शब्दांत कौतुक करण्यात आले आहे.
नवी दिल्ली: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता ४० दिवस झाले आहे. युद्ध न थांबवण्याची भूमिका इस्रायलने घेतली आहे. भारताने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. गाझापट्टीत सुरू असलेल्या धुमश्चक्रीचा संदर्भत घेत, भारतातील काश्मीर हे गाझा बनले नाही, याचे सगळे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाते, असे स्पष्ट मत जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्ष शेहला रशीद यांनी व्यक्त केले आहे.
काश्मीरचे गाझा बनले नाही. काश्मीरमध्ये जे सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे, परिवर्तन झाले आहे, हे केंद्रातील मोदी सरकारमुळे झाले आहे, अशी स्तुतिसुमने शेहला रशीद यांनी उधळली आहेत. यापूर्वी शेहला रशीद यांनी काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांबाबत सहानुभूती व्यक्त केली होती. यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, हे सत्य आहे. पण हे माझे मत २०१० पूर्वीचे होते. आता ते मत बदलले आहे. आजच्या घडीला काश्मीरमध्ये जी परिस्थिती पाहायला मिळत आहे, त्याबाबत मोदी सरकारचे आभार मानायला हवेत, असे शेहला रशीद यांनी म्हटले आहे.
काश्मीरमधील स्थिती बदलली आहे
काश्मीरमध्ये गाझासारखी परिस्थिती नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. काश्मीर फक्त विरोधी आंदोलने, निषेध मोर्चे होत असल्याचे पाहायला मिळत होते. दहशतवाद, घुसखोरीच्या घटनांसाठी काश्मीर ओळखले जायचे. मात्र, काश्मीरमधील स्थिती बदलली आहे. बदललेल्या परिस्थितीचे श्रेय सध्याच्या केंद्र सरकारला, विशेषतः पंतप्रधानांना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देऊ इच्छिते, या शब्दांत शेहला रशीद यांनी कौतुक केले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारची धोरणे आणि नीति यांवर शेहला रशीद यांनी यापूर्वी जोरदार टीका केली होती. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर शेहला रशीद यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच भारतीय सैन्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. मात्र, यानंतर आता शेहला रशीद यांनी केंद्रातील मोदी सरकारची कौतुक केले आहे.