मुंबई - शिवसेना विरुद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत वादात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. आठवले हे कंगनाच्या घरी पोहोचले असून कंगनाशी चर्चा करणार आहेत. कंगना बुधवारी मुंबईत आल्यानंतर तिने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत, तिच्या कार्यालयावरील कारवाईचा संताप व्यक्त केला. शिवसेना-कंगना वाद जोर धरत असतानाच रामदास आठवले कंगनाच्या भेटीला तिच्या घरी गेले आहेत.
कंगनाने बुधवारी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं होत. आता कंगनाला हा एकेरी उल्लेख महागात पडणार आहे. याबाबत वकील नितीन माने यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल अभिनेत्री कंगना राणौतविरोधात तक्रार दाखल केली आहे. नितीन यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार नितीश माने यांनी कंगना हिने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे तुझे क्या लगता है! कि तुने फिल्म माफिया के साथ मिल के मेरा घर तोडकर बडा बदला लिया है असे शब्द वापरलेला बदनामीकारक व्हिडीओ अपलोड केला म्हणून तक्रार दाखल केली. त्यामुळे, कंगना आणि शिवसेना वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या वादामुळे राज्यातील आणि देशातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. कंगनाच्या समर्थनार्थ भाजपा पुढे येत असतानाचा आता आठवले थेट तिच्या घरी गेले आहेत.
रामदास आठवले कंगनाच्या घरी पोहोचले असून ते भेटीनंतर नेमकं काय बोलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, यापूर्वीही आठवले यांनी सुशांतच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी, याप्रकरणात आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे आश्वासनही आठवलेंनी राजपूत कुटुंबीयांना दिले होते. आता, शिवसेना विरुद्ध कंगना वादात आठवलेंनी थेट कंगनाच्या घरी जाऊन शिवसेनेला अप्रत्यक्षपणे डिवचले आहे.
कंगना २ कोटींचा दावा ठोकणार
अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई महापालिकेने ऑफिस तोडल्य़ानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही या वादात ओढले आहे. तसेच आता महापालिकेवर गुन्हा दाखल करण्याच्या विचारात असल्याचे तिचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने उचललेल्या पावलावरून कंगना नाराज असून ते ऑफिस तिच्यासाठी स्वप्नांचे ऑफिस होते. वकिलाने हे देखील सांगितले की, महापालिकेने ही कारवाई कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेली आहे. कंगनाच्या ऑफिसचे जेवढे नुकसान झाले आहे त्याची एकूण रक्कम 2 कोटींच्या घरात जाते. तसेच कंगनाने उच्च न्यायालयात बीएमसीने बेकायदा कारवाई केल्याचे अॅफिडेव्हीट दिले आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्याविरोधात कारवाई करणार असे तिचे म्हणणे आहे. आज तकने सिद्दीकी यांची मुलाखत घेतली आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, कंगनाच बोलवता धनी वेगळाच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, याची सुज्ञ जनतेला कल्पना असल्याचं कोल्हे म्हणाले. कोणाला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. लाखो तरुणांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या हाती नोकऱ्या नाहीत. जीडीपीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. एका बाजूला अर्थव्यवस्था संकटात असताना दुसऱ्या बाजूला दर दिवशी कोरोनाचे जवळपास ९० हजार रुग्ण सापडत आहेत. आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगनाला नाहक महत्त्व दिलं जातं असल्याचं कोल्हे म्हणाले.