माफी मागा अन्यथा...; सुशांतच्या भावाचा संजय राऊत यांना स्पष्ट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 02:47 PM2020-08-18T14:47:47+5:302020-08-18T14:47:58+5:30
सुशांतचे त्याच्या वडिलांसोबत चांगले संबंध नव्हते असं विधान संजय राऊत यांनी केले होते.
नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput Case) यांच्या निधनाला आता एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. आता सीबीआयने याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणाला राजकीय वळण लागल्याने शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील आता या प्रकरणात उडी घेतली होती. सुशांतचे त्याच्या वडिलांसोबत चांगले संबंध नव्हते असं विधान संजय राऊत यांनी केले होते.
संजय राऊतांच्या या विधानानंतर संजय राऊत यांनी माफी मागितली नाही, तर मानहानीचा दावा ठोकण्याची तयारी सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपा आमदार नीरज सिंह बबलू यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे आता संजय राऊत सुशांतच्या कुटुंबाबाबत केलेल्या विधानामुळे माफी मागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Witnesses are being threatened, and Mumbai Police is not even providing protection to them. The way things are unfolding, the witnesses might get killed. We demand that witnesses should be given police protection: Niraj Singh Babloo, BJP MLA & a relative of #SushantSinghRajputpic.twitter.com/UgBNqur8vG
— ANI (@ANI) August 18, 2020
साक्षीदारांना धमकावले जात आहे. मुंबई पोलिस त्यांना संरक्षणही देत नाहीत. ज्या प्रकारे गोष्टी उलगडत आहेत, त्या पाहता साक्षीदारांना जीवे मारले जाण्याची भीती आहे. साक्षीदारांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे” असे नीरज सिंह बबलू यांनी सांगितले.
नेमकं संजय राऊत काय म्हणाले होते-
मुंबई पोलिसांनी हा तपास नको तितका जास्त खेचला. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीजना रोज चौकशीला बोलवायचे व ‘गॉसिप’ला वाव द्यायचा. या प्रकरणाचा वापर सिनेसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी झाला काय ते पाहायला हवे, असं संजय राऊत यांनी सांगितले होते. सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे वेगळे का झाले? याचा तपास का झाला नाही? मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास नको तितका का खेचला? हे प्रकरण हाय प्रोफाईल होत असल्याचं दिसताच पोलिसांनी माध्यमांना त्याबाबत दिवसाआड माहिती का दिली नाही, असा सवाल करत संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांनाही धारेवर धरले होते.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुसऱ्या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे' असं म्हणत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला होता.
सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूआधी त्याची मॅनेजर दिशा सॅलियन हिने आत्महत्या केली. दोन्ही प्रकरणे संपूर्ण वेगळी. पण राजकीय पुढारी दोन आत्महत्यांचा धागा जुळवत आहेत. दिशा सॅलियन हिच्यावर बलात्कार करून तिला इमारतीवरून फेकले, असा आरोप भाजपाचे एक पुढारी करतात तेव्हा त्यांनी तिच्या कुटुंबाचा थोडाही विचार केलेला दिसत नाही. दिशा सॅलियनच्या वडिलांनी एक पत्र लिहून याबाबत खंत व्यक्त केली. मृत्यूनंतर माझ्या मुलीची व आमच्या कुटुंबाची बदनामी का करता, हा तिच्या माता-पित्यांचा सरळ प्रश्न आहे. दिशा सॅलियन हिचे संपूर्ण कुटुंबच या बदनामीमुळे मानसिकदृष्टय़ा खचले आहे. तिचे वडील डिप्रेशनमध्ये गेले असे आता समोर आले' असंही संजय राऊत यांनी सांगितले होते.
चूक झाली असेल तर मी माफी मागायला तयार- संजय राऊत
मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते माहिती नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेन. मी माझ्या माहितीच्या आधारे बोललो आहे. त्यांचं कुटुंब त्यांच्या माहितीच्या आधारे बिहारमधून आरोप करतंय.” अशी तयारी संजय राऊत यांनी आधीच दर्शवली होती.