लखनऊ: आम्ही १७ मिनिटांत बाबरी मशीद पाडली होती. मग राम मंदिरासाठी कायदा करण्यास किती वेळ लागतो?, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्य असो वा केंद्र, सगळीकडे भाजपाची सत्ता आहे. मग राम मंदिराच्या उभारणीला इतका वेळ का लागतो, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येला भेट देणार आहेत. या भेटीच्या तयारीसाठी सध्या संजय राऊत अयोध्येत आहेत. राम मंदिराच्या मुद्यावरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. 'राष्ट्रपती भवनपासून उत्तर प्रदेशापर्यंत भाजपाची सत्ता आहे. राज्यसभेतले अनेक खासदार राम मंदिराच्या बाजूनं उभे राहतील. राम मंदिराच्या उभारणीला जे विरोध करतील, त्यांचं देशात फिरणं अवघड होईल,' असा इशारादेखील त्यांनी दिला. राम मंदिरासाठी अध्यादेश आणण्याचं आणि त्याची नेमकी तारीख घोषित करण्याचं आव्हान याआधीच शिवसेनेनं भाजपाला दिलं आहे. राम मंदिरावरुन शिवसेनेनं अनेकदा पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपावर कडाडून टीका केली आहे. 'सत्तेत बसलेल्या लोकांना शिवसैनिकांचा अभिमान असायला हवा. शिवसैनिकांनी राम जन्मभूमीतील बाबर राज संपवलं होतं. शिवसेना कधीही रामाच्या नावानं मतांची भीक मागत नाही आणि जुमलेबाजीदेखील करत नाही,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं सामनामधून भाजपावर शाब्दिक हल्ला चढवले होते.
'17 मिनिटांत बाबरी मशीद पाडली, मग राम मंदिरासाठी कायदा करण्यास इतका वेळ का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 4:01 PM