“...तर संजय राऊतांवर हक्कभंग आणू, त्यांना जेलमध्ये टाकू”; बंडखोर आमदारांचा प्रचंड संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 03:01 PM2022-06-28T15:01:48+5:302022-06-28T15:02:57+5:30
प्रेतांच्या जीवावर निवडून आलेल्या संजय राऊतांनी राजीनामा द्यावा, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची भाषा वापरू नये, असा सल्ला बंडखोर आमदारांनी दिला आहे.
गुवाहाटी: शिवसेनेसाठी आम्ही आमचं सर्वस्व दिलेलं आहे. दिल्लीची चांगली संधी असताना महाराष्ट्रात परत आलो. मंत्रिपद गेल्याचं दुःख कधीही वाटलं नाही. मात्र, आम्हाला जर कुणी कुत्रं म्हणायला लागलं, प्रेत म्हणायला लागलं. पिकलं पान म्हणायला लागलं, आम्हाला मेलेली प्रेतं म्हणायला लागलं, घाण म्हणायला लागलं, तर कुणी सहन करायचं, असा सवाल करत, काही झालं तरी संजय राऊत यांची भाषा खपवून घेतली जाणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) शिक्षा करावी. अन्यथा आम्ही संजय राऊतांवर हक्कभंग आणू शकतो आणि प्रसंगी जेलमध्ये टाकू शकतो, असा प्रचंड संताप शिवसेना नेते आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. दुसरीकडे, संजय राऊत बंडखोर वारंवार टीका करताना दिसत आहेत. यावर शेवटी बंडखोर आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रेतांच्या जीवावर निवडून आला असाल, तर राजीनामा द्या
संजय राऊत बंडखोर आमदारांविषयी काहीही बोलत आहेत. आम्हीही शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलं आहे. संजय राऊत यांची ही भाषा ऐकून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी झालोय का, असा संतप्त सवाल करत रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्या राऊतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षा केलीच पाहिजे. तुम्ही २०० माणसं उतरवण्याची भाषा करत असाल, तर आम्ही २ हजार माणसं उतरवू शकतो. संजय राऊत यांच्यावर काही कारवाई झाली नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा ठराव आणू शकतो. त्यांना जेलमध्ये पाठवू शकतो. मात्र, तसे आम्हाला काहीही करायचं नाही. तसेच तुम्ही आमच्याविषयी वाट्टेल ते बोलत आहात. मग प्रेतांच्या जीवावर निवडणून आला असाल, तर राजीनामा द्या. अजून तुम्ही शपथ घेतलेली नाही. सर्व शिवसेनेच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी तुम्हाला आमचं मत देऊन विजयी केलं आहे. त्यामुळे आम्हाला बोलण्याचा हक्क आहे, या शब्दांत दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.
आदित्य ठाकरे सुशिक्षित नेतृत्व आहे, त्यांनी राऊतांची भाषा बोलू नये
उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे आम्ही आदित्य ठाकरे यांनाही मानतो. त्यांनाही तितकाच आदर देतो. उद्याचे महाराष्ट्रातील एक चांगले आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. मात्र, आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांची भाषा बोलू नये. आमचं प्रेम, आशीर्वाद पाठिंबा तुमच्यासोबत आहे. त्याला तडा जाऊ देऊ नका, असे वडीलकीचा सल्लाही दीपक केसरकर यांनी यावेळी बोलताना दिला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या सहकार्यामुळे आणि भक्कम पाठिंब्यामुळेच युतीचे सरकार सक्षमपणे चालवले. मात्र, त्यानंतर जनतेचा कौल तुम्ही न स्वीकारता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी केली. आम्ही शिवसेना-भाजप युतीचे आमदार आहोत. आम्ही उद्धव ठाकरे यांना पुन्हा कळकळीची विनंती करतो की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट निर्माण झाले, असे दीपक केसरकर यांनी निक्षून सांगितले.