संजय राऊतांनी गुवाहाटीत येऊ नये, हीच कळकळीची विनंती; बंडखोर आमदारांनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 02:20 PM2022-06-27T14:20:06+5:302022-06-27T14:20:51+5:30
एकीकडे संजय राऊत यांच्यावर टीका करताना, दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंडखोर आमदारांनी कौतुक केले आहे.
गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राज्याचे आणखी एक मंत्री उदय सामंतही गुवाहाटीला पोहोचले. मात्र, या बंडखोरीसंदर्भातील सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. यातच आता बंडखोर आमदार शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्याकडून होत असलेल्या विधानासंदर्भात बंडखोर आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बंडखोर आमदारांमध्ये काही मंत्रीही आहेत. राज्याचे कामकाज थांबू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडील खाती काढून त्याचा कार्यभार अन्य मंत्र्यांकडे वर्ग केला आहे. बंडखोर आमदारांचे प्रवक्ते असलेले दीपक केसरकर यांनी या सर्व घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य निर्णय घेतला आहे. राज्याचा कारभार थांबू नये, ही आमचीही इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री राज्याच्या बाहेर गेले असतील, तर त्यांची खाती इतरांकडे देऊन राज्यकारभार सुरळीत सुरू ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष असल्यामुळे त्यांनी त्याचे पालन केले.
संजय राऊतांनी गुवाहाटीत येऊ नये, हीच कळकळीची विनंती
राज्यातील राजकारण ढवळून निघत असताना दुसरीकडे संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावत मंगळवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना, माझी मान कापली तरी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले होते. यावर प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर म्हणाले की, संजय राऊतांनी गुवाहाटीत येऊ नये, हीच कळकळीची विनंती आहे. मी संयमाने बोलतो. बाळासाहेब ठाकरे असते तर हाकलून लावले असते. बाळासाहेब असते बंडखोरी झालीच नसती. त्यांनी मायेने पाठिवर थाप फिरवून म्हणणे ऐकून घेतले असते. संजय राऊतांचे ईडीचे प्रकरण जुनेच आहे. राऊतांचे टायमिंगही चुकीचे असते. आम्हाला मृत झालेले आहेत बोलतात. संजय राऊतांचे टायमिंग चुकते. ईडीच्या प्रश्नांना सौम्य भाषेत उत्तर द्यावीत, असा टोला दीपक केसरकर यांनी राऊतांना लगावला.
दरम्यान, संजय राऊत यांच्यावर बंडखोर आमदार संतप्त आहे. या लोकांची मते घेऊन राज्यसभेत गेले. थोडीशी शिल्लक असेल तर राजीनामा द्या, तुमचे राष्ट्रवादीत हितचिंतक आहेत त्यांची मते घेऊन राज्यसभेत जा. संजय राऊतांना मतदान करून आम्ही चुकलो, आमच्या चुकीबद्दल ईश्वराची माफी मागतो. आमच्याकडून मते मिळाली त्यांनी राजीनामा द्यावा. राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार व्हावे. ते अर्धावेळ राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून काम करतात. आमच्याबद्दल बोलू नये. असा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला देऊ नये अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.