“एकनाथ शिंदे वगळता अन्य कोणाच्याही संपर्कात नाही, गैरसमजांना शिवसैनिकांनी बळी पडू नये”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 04:27 PM2022-06-28T16:27:23+5:302022-06-28T16:28:38+5:30
हिंदुत्वासाठी मरेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार असल्याचे सुहास कांदे यांनी म्हटले आहे.
गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. यातच आता एकनाथ शिंदे गटातील अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांना जबरदस्तीने तिथे ठेवलेले आहे, असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र, हे दावे शिंदे गटाकडून फेटाळले जात आहेत. एकामागून एक व्हिडिओ जारी करत आमदार आपले म्हणणे मांडत आहेत. यातच आता नाशिकमधील नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटरवरून सुहास कांदे यांचा भूमिका स्पष्ट करणारा व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये सुहास कांदे यांनी म्हटले आहे की, वंदनीय शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा आणि आनंद दिघे यांची विचारधारा घेऊन आमचे नेते एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. आम्ही गुवाहाटीला जे आलो आहोत, ते माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि विविध विकास योजना मार्गी लावण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत थांबलेलो आहे, असे सुहास कांदे यांनी स्पष्ट केले.
हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदेंसोबत
हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदेंसोबत थांबलेलो आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. माझ्या नांदगाव मतदारसंघातील विविध विकास योजना मार्गी लागल्या पाहिजेत यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. आम्ही सर्व जण इथे हसत खेळत राहत आहोत. तसेच एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. हिंदुत्वासाठी आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मरेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार आहोत. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्व शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती, असेही सुहास कांदे यांनी यावेळी नमूद केले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीला आमचा विरोध आहे. माझ्या सांगोला मतदारसंघातील विकास निधी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही, असे स्पष्टीकरण सोलापूर जिल्हा सांगोला येथील शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिले.