विचारधारा वेगळी असली तरी देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 05:04 PM2023-06-23T17:04:00+5:302023-06-23T17:04:49+5:30
opposition party meeting in patna : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी आज बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक पार पडली.
पाटणा : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी आज देशातील विरोधी पक्षांची बिहारची राजधानी पाटणा येथे बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅटट्रिक रोखण्यासाठी कॉंग्रेससह देशातील विविध प्रादेशिक पक्षांनी एकजुट दाखवली आहे. आज १५ विरोधी पक्षांनी एकत्र येत बिहारची राजधानी पाटणा येथून रणशिंग फुंकले. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात आली असल्याचे कळते. विरोधकांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'तानाशाही' म्हणत मोदी सरकारला लक्ष्य केले.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी म्हटले, "सर्वांना एकत्रित केल्याबद्दल नितीश कुमार यांचे आभार. देशातील प्रमुख पक्षांचे प्रमुख आज इथे एकत्र आले आहेत. कश्मीर ते कन्याकुमारीपासून सर्वजण एकत्र आले आहेत. सर्वांना माहिती आहे की, वेगवेगळे पक्ष आहेत, विचार वेगळे आहेत पण देश एक आहे. देशाला वाचवण्यासाठी आणि देशाची एकता तथा अखंडता कायम ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. याच्यापुढे देशाच्या प्रजातंत्रावर जो कोणी आघात करेल त्याचा आम्ही विरोध करू. जे देशद्रोही आहेत आणि तानाशाही लावू पाहत आहेत त्यांना आम्ही विरोध करूच. तसेच विचारधारा वेगळी असली तरी देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत."
दिग्गज नेत्यांची उपस्थिती
दरम्यान, विरोधकांच्या बैठकीला कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सीताराम येचुरी, डी राजा यांसह इतरही काही नेत्यांची उपस्थिती होती.