भोपाळ - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगितले. कलम 370 लागू करणं हे पंडित जवाहरलाल नेहरु यांची चूक सुधारण्याचा योग्य निर्णय घेतला. या निर्णयामुळे मी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची पूजा करायला लागलो आहे असं वक्तव्य चौहान यांनी केलं आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी याआधी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना दोष दिला होता. त्यांच्या या विधानावरुन वाद निर्माण झाला होता. यावर सोमवारी शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपण केलेलं विधान हे तथ्यावर आधारित होतं आणि संपूर्ण जबाबदारीने हे वक्तव्य केलं असल्याचं सांगितले.
शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, जम्मू काश्मीरबाबत जवाहरलाल नेहरु यांनी केलेली चूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारली आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे. पहिले मी मोदी, अमित शहा यांना नेता मानायचो त्यांच्याकडे श्रद्धेच्या दृष्टीकोनातून पाहायचो मात्र या निर्णयामुळे मी त्यांची पूजा करतो असं विधान शिवराज सिंह चौहान यांनी केलं.
तर शिवराज सिंह चौहान यांच्या विधानावरुन दिग्विजय सिंह यांनी त्यांच्यावर पलटवार केला होता. शिवराज चौहान यांना पंडित नेहरुंच्या नखाची सरही येणार नाही. त्यांच्याबद्दल विधान करताना त्यांना थोडी लाज वाटायला हवी होती. त्यावर शिवराज सिंह चौहान यांनी दिग्विजय सिंह यांना टोला लगावला आहे. मी कोणत्याही कुटुंबाचा गुलाम नाही. मी भारतमातेच्या चरणावर नमन करतो. माझं जीवन भारत मातेच्या सेवेसाठी समर्पित आहे. आपल्या देशाचा स्वाभिमान वाढत राहो हाच आमचा संकल्प आहे असं शिवराज चौहान यांनी सांगितले.
तर पी चिंदबरम यांनी केलेल्या विधानवर शिवराज सिंह चौहान म्हणाले की, काँग्रेसच्या जनतेला काश्मिरी जनतेविषयी प्रेम नाही. ते फक्त हिंदू-मुस्लीम याआधारे देशाला बघतात. भाजपासाठी देश हा एक नागरिक आहे. आम्ही हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई या सर्वांना मानतो. काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित करणे, गरिबी हटविणे हे आमचे ध्येय आहे.