चित्तूर - आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे ऑक्सीजनचा पुरवठा खंडीत झाल्याने तब्बल 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. येथील एसव्हीआर रुईया सरकारी रुग्णालयात सोमवारी रात्रीच्या सुमारासा ही दुर्घटना घडली. त्यामध्ये, 11 जणांचा मृत्यू झाला असून इतर 5 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्यानेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने व्हेंटिलेटवर असलेल्या 11 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये, 9 रुग्ण कोविड पॉझिटीव्ह होते, तर 3 रुग्ण नॉन कोविड उपचार घेत होते. चेन्नईहून ऑक्सिजन टँकर तिरुपतीच्या दिशेने रवाना झाला. पण हा ऑक्सिजिन टँकर वेळेत पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांना तातडीने ऑक्सिजन सिलिंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला, अशी माहिती चित्तूरचे जिल्हाधिकारी एम. हरी नारायणन यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
तिरुपतीमधील रुग्णालयात ऑक्सिजन अभावी ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची खरबदारी घेण्याचे निर्देशही रेड्डी यांनी दिले आहेत. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतोय की नाही याची वेळोवेळी खबरदारी घेण्यात यावी. तसंच तज्ज्ञांकडून तंत्रज्ञांची माहिती करून घ्यावी. रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यावर लक्ष द्यावं. ऑक्सिजनची वाहतूक आणि पुरवठा सुरूच आहे. त्याकडे लक्ष देऊ नये, असे निर्देश रेड्डी यांनी दिले.