श्रीनगर - गेल्या काही काळापासून जम्मू काश्मीर पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून दहशतवादाचा मार्ग पत्करला असून, या प्रकारामुळे पोलीस आणि सरकारची चिंता वाढली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलामधील 12 पोलीस कर्मचारी 30 हत्यारांसह पसार होऊन दहशतवाद्यांना मिळाले आहेत. हल्लीच विशेष पोलीस आदिल बशीर हा पोलीस खात्यातून पसार झाला होता. बशीर हा दक्षिण काश्मीरमधील वाची विधानसभा क्षेत्रातील पीडीपी आमदार इजाज मीर यांच्या अधिकृत निवासस्थानातून आठ हत्यारे घेऊन पळाला होता. त्याने पळवलेल्या हत्यारांमध्ये सात एके 47 आणि एका पिस्तुलाचा समावेश होता. त्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी अशा प्रकारांबाबत चिंता व्यक्त करून एक अंतर्गत अहवाल तयार केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 पोलीस कर्मचारी आणि दोन सैनिक दहशतवादी गटांमध्ये सामील झाले आहेत. तसेच त्यांनी आपल्यासोबत 30 हत्यारे पळवली आहेत. हिज्बुल मुजाहिद्दीनशी असलेल्या कथित संबंधांच्या आरोपावरुन पोलिसांनी 5 ऑक्टोबर रोजी 29 वर्षीय बीएसएफ कॉन्स्टेबल शकीर वानी आणि एका स्थानिक तरुणाला अटक केली होती. वानी हा हिज्बुलचा भूमिगत कार्यकर्ता असून, दहशतवाद्यांना रसद पुरवण्याचे काम करतो, असा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांची भरती करण्याचे काम त्याच्याकडे देण्यात आले होते, असा दावाही पोलिसांनी केले आहे.शकीर वानीप्रमाणेच रशीद शिगन हा पोलीस कर्मचारीही नोकरी सोडून दहशतवाद्यांना मिळाल्याची माहितीही समोर आला आहे. रशीद हा हिज्बुलचा सक्रीय सदस्य होता, तसेच पोलिसांची नोकरी करताना त्याने गेल्या दीड वर्षात किमान 13 दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग घेतला होता.
धक्कादायक! काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांत 12 पोलीस कर्मचारी बनले दहशतवादी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 8:41 AM