नवी दिल्ली: मागील काही वर्षात मुलांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. एका रिपोर्टनुसार गेल्या वर्षी दररोज सरासरी 31 मुलांनी आत्महत्या केल्या होत्या. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो(NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये 11 हजार 396 मुलांनी आत्महत्या केल्या, जे 2019 च्या तुलनेत 18% आणि 2018 च्या तुलनेत 21% जास्त आहे. 2019 मध्ये देशात 9,613 आणि 2018 मध्ये 9,413 मुलांनी आत्महत्या केल्या होत्या.
कोरोनामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणामNCRBनुसार, कौटुंबिक समस्या(4,006), प्रेमप्रकरण (1,337) आणि आजार (1,327) ही 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. बाल संरक्षणावर काम करणाऱ्या सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेचे उपसंचालक प्रभात कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, कोविड महामारी आणि शाळा बंद झाल्यामुळे मानसिक आरोग्याचा प्रश्न वाढला आहे. मुलांच्या आत्महत्येची वाढती संख्या ही प्रणालीगत अपयश दर्शवते. मुलांना अशी व्यवस्था देण्याची जबाबदारी पालक, कुटुंब, शेजारी आणि सरकार या सर्वांची आहे, जिथे मुले त्यांच्यातील क्षमता ओळखू शकतील आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास तयार असतील.
दररोज 31 मुलांची आत्महत्या'चाईल्ड राइट्स अँड यू'च्या पॉलिसी रिसर्च आणि अॅडव्होकसीच्या संचालक प्रीती महारा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, महामारीच्या सुरुवातीपासूनच सर्वात मोठी भीती होती की याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो आणि NCRB आकडे या भीतीवर आधारित आहेत. कोरोना साथीच्या रोगामुळे लहान मुलांचा मानसिक आघात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये 11,396 मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी 5,392 मुले आणि 6,004 मुली होत्या. म्हणजेच गेल्या वर्षी दररोज 31 मुलांनी तर तासाला 1 मुलाने आत्महत्या केली.
पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष्य देण्याची गरजप्रीती महारा पुढे म्हणाल्या, कोविड-19 मुळे शाळा बंद, घराला कुलूप, मित्र किंवा शिक्षकांशी बोलता न येणे, यामुळे मुलांमधील तणाव वाढला आहे. त्यांच्यापैकी अनेकांना घरातील तणावपूर्ण वातावरण, त्यांच्या प्रियजनांचा मृत्यू, संसर्गाची भीती आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. अनेक मुले ऑनलाइन क्लासेससाठी धडपडत आहेत तर अनेकजण सोशल मीडियाला बळी पडले आहे. या सगळ्याचा मुलांवर खोलवर परिणाम झालाय.
पोड्डा फाउंडेशनचे व्यवस्थापकीय ट्रस्ट आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञ प्रकृति पोद्दार यांनी सांगितले की, पालकांनी आपल्या मुलांची मानसिक स्थिती किती गंभीर आहे हे समजून घेतले पाहिजे. मानसिक समस्यांची लक्षणे आणि नमुने ओळखण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.