नवी दिल्ली- छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केंद्र सरकारनं सरकारी शाळांमध्ये वाटप केलेल्या टॅबमध्ये पहिल्यापासूनच अश्लील फोटो टाकलेले असल्याचं निदर्शनास आलं आहे. अनेक शाळांमध्ये वाटण्यात आलेल्या टॅबमध्ये अश्लील फोटो सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून आमच्याकडे अनेक शाळांनी टॅबलेटसंदर्भात तक्रारी केल्या आहेत.टॅबलेट सुरू केल्यानंतर अश्लील फोटो दिसत असल्याचे छत्तीसगडचे क्लस्टर संसाधन समन्वयक गौरांग मिश्रा यांनी सांगितले. या प्रकाराची माहिती अधिका-यांना देण्यात आली आहे. लवकरच याचा तपास केला जाईल, असं मिश्रा म्हणाले आहेत. सरकारी शाळांमधल्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांच्या हजेरीचा तसेच दैनंदिन कामाचा तपशील ठेवण्याच्या उद्देशाने हे टॅबलेट वाटण्यात आले होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यंदाच्या वर्षी छत्तीसगडमधील सरकारी शाळांमध्ये या टॅबलेटचे वाटप केले होते. शाळांमधील हजेरीचा पट आणि कामाचा लेखाजोखा व्यवस्थित राहावा, टॅबलेट वाटण्याच्या योजनेमागे हा उद्देश आहे. जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येकी 10 हजार रुपये किंमत असणाऱ्या या टॅबलेटचे राज्यातील सर्वच सरकारी शाळांमध्ये वाटप करण्यात आले होते.
धक्कादायक! सरकारनं शाळांमध्ये वाटलेल्या टॅबमध्ये अश्लील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 5:16 PM