लखनौ - कायदा शाखेच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशपोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) चिन्मयानंद यांना निवासस्थानातून अटक केली. मात्र, याप्रकरणी चिन्मयानंद यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हाच दाखल करण्यात आला नाही.
एसआयटीने चिन्मयानंद यांना अटक करुन त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यांच्या वकील पूजा सिंह यांनी सांगितले की, अटकेसंदर्भातील मेमोवर एसआयटीने चिन्मयानंद यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या; परंतु अटकेसंदर्भातील अन्य कोणतीही कागदपत्रे त्यांना देण्यात आली नाहीत. विशेष म्हणजे चिन्मयानंद यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हाच दाखल करण्यात आला नसल्याचे उघडकीस आले आहे. याउलट बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थीनीविरुद्धच 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करुन तिच्या तीन सहकाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यामुळे पीडित मुलीने आश्चर्य व्यक्त केले आहे. तर, चिन्मयानंद यांनी बलात्काराशिवाय इतर सर्व गुन्हे कबुल केल्याचे एसआयटीने म्हटले आहे.
चिन्मयानंद यांना सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले असता तिथे अन्य कोणालाही काही काळ प्रवेश नाकारल्याने अन्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल झाले. त्यांच्या अटकेमध्ये कोणतीही बाधा येऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांचे निवासस्थान, रुग्णालय, न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. चिन्मयानंद यांच्या संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयात कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने चिन्मयानंद यांनी बलात्कार केल्याचा, तसेच वर्षभर लैंगिक पिळवणूक केल्याचा आरोप केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सुरू होता. चिन्मयानंद तीनदा लोकसभेवर निवडून आले होते. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही होते.