मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सचिवावर कारवाई सुरू केली आहे. याचं कारण म्हणजे त्यांच्या तीन पत्नी आगामी पंचायत निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. सचिवाने तिसर्या पत्नीची माहिती लपविल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, तीन महिलांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या उमेदवारी अर्जात ग्रामपंचायत सचिव सुखराम सिंह यांचे नाव पती म्हणून नमूद केले होते. यातील दोन जणी सरपंचपदासाठी एकमेकां विरुद्ध लढत आहेत, तर तिसरी जिल्हा परिषद सदस्यपदाची निवडणुक लढवत आहे.
नक्की कसं फुटलं बिंग?
देवसर जनपद पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बीके सिंग यांनी जिल्हा पंचायतीच्या सीईओंकडे अहवाल सादर केला असून सुखराम सिंग यांच्यावर निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली आहे. बीके सिंह म्हणाले की, विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना पंचायत निवडणूक लढवलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची किंवा नातेवाईकांची माहिती देण्यास सांगण्यात आले होते. ते म्हणाले की, ग्रामपंचायत घोघराचे सचिव सुखराम सिंग यांनी पंचायत आणि ग्रामविकास विभागाला त्यांच्या दोन पत्नी निवडणूक लढवत असल्याची माहिती दिली, पण त्यांनी तिसरी पत्नी गीता सिंग यांची माहिती लपवून ठेवली.
सीईओ म्हणाले की सुखराम सिंग यांनी तिन्ही पत्नीचे पती तेच असल्याचे मान्य केले आहे, त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, परंतु नोटिशीला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यानंतर, शिस्तभंगाची कारवाई आणि निलंबनाची शिफारस करणारा अहवाल जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
मिळालेल्या वृत्तानुसार, सुखराम सिंह यांच्या दोन पत्नी - कुसुमकली सिंह आणि गीता सिंह या पिपरखंड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. गीता सिंह या पूर्वी या ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या. या अहवालात असे म्हटले आहे की, सुखराम सिंह यांची दुसरी पत्नी उर्मिला सिंह या देखील पेड्रा जनपद पंचायत सदस्यासाठी निवडणूक लढवत आहेत.