Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच हे तुकडे एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकण्यात आले होते. या प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत असून, दररोज नवनवीत खुलासे होताना दिसत आहेत. यातच पोलिस आरोप आफताब पुनावालाची कसून चौकशी करत आहेत. आरोपी आफताब पूनावाला याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली. मात्र, अद्यापही पोलिसांच्या हाती ठोस काही लागले नसल्याचे सांगितले जात आहे.
श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या आफताब पूनावाला याला अटक होऊन २३ दिवस उलटले आहेत. अद्यापही पोलिसांना योग्य दिशेने वाटचाल करता आली नसल्याचे म्हटले जात आहे. दिल्ली पोलीस ठोस पुराव्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. यावरुन आफताबने अतिशय शिताफिने हा गुन्हा केल्याचे बोलले जात आहे. १८ मे २०२२ रोजी दिल्लीतील छतरपूर परिसरात देशातील सर्वांत बड्या हत्याकांडाचे रहस्य उघडकीस आले. जीवापाड प्रेम करणाऱ्या अन् विश्वास ठेवणाऱ्या श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतरही आफताबचा क्रूरपणा पाहून सगळ्यांचेच हृदय हेलावले. अनेक महिन्यांनंतर अखेर गेल्या महिन्याच्या १२ तारखेला पोलिसांनी आफताबला अटक केली. श्रद्धाच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची नोंद केली आणि आफताबवर संशय व्यक्त केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
२३ दिवस झाले... पण पोलिसांचे हात रिकामे!
या २३ दिवसांत पोलिसांची अनेक पथके तपासासाठी अनेक ठिकाणी गेली. पॉलिग्राफ चाचण्या झाल्या. एवढेच नाही तर दोन वेळा नार्को टेस्टही करण्यात आली. या सर्व प्रकारानंतरही पोलिसांचे हात कमी-अधिक प्रमाणात रिकामे असल्याचे म्हटले जात आहे. पहिली पॉलिग्राफ चाचणी अपेक्षित होती. प्रश्नांदरम्यान आफताबच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले गेले. यानंतर नार्को टेस्टमध्ये आफताब सर्वकाही कबूल करू शकेल, असा कयास बांधण्यात आला. पण आतापर्यंत नार्को टेस्टचे जे रिपोर्ट येत आहेत, ते पाहता हे प्रकरण तितकेसे सरळ नाही हे स्पष्ट होत असल्याचे सांगितले जात आहे.
आफताबची २ टप्प्यांत १० दिवस कसून चौकशी
श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचे शीर कुठे टाकून दिले, याचा शोध पोलीस घेत आहेत. यासंदर्भात एक तलावही रिकामा करण्यात आला. हरतऱ्हेने आफताबची चौकशी केली जात आहे. परंतु, पोलिसांना ठोस असे काहीच मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. नार्को टेस्टनंतर आफताबकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना असा कोणताही मोठा पुरावा मिळालेला नाही. जेणेकरून हे प्रकरण पुढे जाऊ शकेल. आफताबच्या चलाखीमुळे पोलिसांच्या हाती काही लागत नसून, पोलीस पुराव्यासाठी कठोर मेहनत घेताना दिसत आहेत. पोलिसांनी आफताबची आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये १० दिवस कसून चौकशी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"