नवी दिल्ली - एखाद्याने केलेली मदत अथवा दिलेले पैसे हे काही लोक अगदी सहज विसरून जातात. पण तुम्हाला जर कोणी तब्बल 11 वर्षांनी एका खाल्लेल्या वस्तुचे पैसे दिले असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. 11 वर्षांपूर्वी फुकट खाल्लेल्या शेंगांची आता परतफेड करण्य़ात आल्याची एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. अमेरिकेहून येऊन भावा-बहिणीने ऋण फेडले आहेत. मोहन नावाच्या व्यक्तीने उकडलेल्या शेंगा विकणाऱ्याकडून मुलांसाठी मोफत शेंगा घेतल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, 2010 मध्ये ही कहाणी सुरू झाली होती. मोहन आपला मुलगा प्रणव आणि मुलगी सुचिता यांच्यासह आंध्रप्रदेशातील यू कोथापल्ली बीचवर फिरायला आला होता. येथे मोहनने आपल्या मुलांसाठी उकडलेल्या शेंगा खरेदी केल्या. मुलांनी शेंगा खाण्यास सुरुवातही केली. मात्र जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा मोहनच्या लक्षात आलं की, तो त्याचं पाकिट घरीच विसरला आणि त्याच्याकडे काहीच पैसे नव्हते. त्यामुळे मोहनने पैसे दिले नाहीत. सत्तैया असं शेंगा विकणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं.
11 वर्षांनंतर मोहनची मुलं भारतात आली...
शेंगा विकणाऱ्या व्यक्तीने देखील पैसे मागितले नाही आणि मोफतच शेंगा दिल्या. मोहनने त्याला सांगितलं की, मी लवकरच तुझे पैसे परत करतो. यावेळी मोहनने सत्तैयाचा एक फोटोदेखील घेतला. मात्र नंतर मोहन हे विसरून गेला आणि तो अमेरिकेला परतला. आता 11 वर्षांनंतर मोहनची मुलं भारतात परत आली. आल्यानंतर भावा-बहिणींनी पहिल्यांदा सत्तैयाकडे जाण्याचं ठरवलं. मात्र त्याला शोधणं सोपं नव्हतं. यासाठी त्यांनी काकीनाडा शहराच्या आमदाराची मदत घेतली.
सत्तैयाच्या कुटुंबाला दिले 25 हजार रुपये
काकीनाडा शहराचे आमदार चंद्रशेखर रेड्डी यांनी आपल्या मोबाईलवरुन फेसबुक पोस्ट शेअर केली. त्यांची पोस्ट जोरदार व्हायरल झाली आणि काही लोकांनी आमदारांना सत्तैयाबद्दल माहिती दिली. मात्र दुर्देवं म्हणजे आता तो या जगात नाही. पण दोन भावंडांनी आपलं वचन पूर्ण केलं. सत्तैयाच्या कुटुंबाला 25 हजार रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आणि 2010 मध्ये मोफत खाल्लेल्या शेंगांची अशाप्रकारे परतफेड केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.