बेंगळुरूः कर्नाटक विधानसभेची निवडणूक १२ दिवसांवर आलीय. प्रचाराचा धुरळा उडू लागलाय. भाजपा आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक 'दक्षिणेवर स्वारी' करण्यासाठी सज्ज झालेत. असं असताना, विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सिद्धरामय्या आज एका जाहीर सभेत चक्क पेंगताना दिसले. कलबुर्गी इथल्या सभेत हा प्रकार घडलाय आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. शेजारच्या नेत्यांना जागं केल्यावर सिद्धरामय्या यांनी डोळे उघडले, पण त्यांना काही केल्या झोप आवरतच नव्हती. कर्नाटक विधानसभेच्या मतदानासाठी 12 दिवसांहून कमी कालावधी शिल्लक राहिलाय. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून अनेक रॅली काढण्यात येत आहेत. अशाच एका रॅलीत कर्नाटकाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या हे डुलक्या घेताना पाहायला मिळाले. कलबुर्गी येथील रॅलीदरम्यान काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या शेजारीच बसलेले सिद्धरामय्या मंचावरही गाढ झोपेत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींपासून पक्षाचे इतर नेते रात्रंदिवस निवडणूक रॅली घेत आहेत. यादरम्यान उन्हातान्हातही कार्यकर्त्यांना अनेक किलोमीटर दूरवरचा प्रवास करावा लागतो. त्याचा थकवा आल्यामुळेच कदाचित सिद्धरामय्या निद्राधीन झाले असावेत.मंचावर पक्षाचा दुसरा एक नेता भाषण देत होता, त्याच वेळी सिद्धरामय्या डुलक्या घेत होते. अर्थात मध्येच त्यांची निद्रा भंग झाली आणि पुन्हा ते भाषण ऐकू लागले. रविवारी काँग्रेस पक्षानं जन आक्रोश रॅलीही काढली होती. त्या रॅलीतही काँग्रेसनं केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. काँग्रेसला सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात पुन्हा कर्नाटकात सत्तेत येण्याची आशा आहे. तसेच ओपिनियन पोलमधूनही कर्नाटकात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणार असल्याचं संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री असल्यानं सिद्धरामय्या यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत. विरोध पक्षही सिद्धरामय्यांवर लागोपाठ आरोप करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शाहांनीही सिद्धरामय्या सरकारला भ्रष्ट म्हटलं आहे. केंद्रानं दिलेला पैसा सिद्धरामय्या कर्नाटकातील जनतेसाठी खर्च न करता स्वतःच्या खिशात ठेवतात, असा आरोपही भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी केला होता.
Video: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या भरसभेत पेंगतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 5:26 PM