बंगळुरु : विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत न मिळाल्याने मुख्यमंत्री पदावरून दूर रहावे लागलेल्या काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज मवाळ भूमिका घेतली आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाला काँग्रेसने दिलेला बिनशर्त पाठिंबा कायम राहणार असून हे सरकार पुढील पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी आज सांगितले.
कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या यांच्याकडून मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना सातत्याने इशारे देण्याचे प्रकार सुरु होते. यामुळे धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात कुमारस्वामींना अश्रू अनावर झाले होते. मंत्रालय वाटपावरूनही तणाव निर्माण झाला होता. तसेच पुन्हा मुख्यमंत्री बनण्याबाबतच्या सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यानेही कर्नाटकमध्ये खळबळ माजली होती. परंतू आज अचानक सिद्धरामय्या यांनी नरमाईची भुमिका घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.