पैशांसाठी सिद्धूने आईला घराबाहेर काढले, बहिणीचेच गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 07:52 AM2022-01-29T07:52:03+5:302022-01-29T07:52:47+5:30
बहीण सुमन यांचा गंभीर आराेप, आई-वडील विभक्त झाल्याचा दावाही खाेटा
लाेकमत न्यूज नेटवर्क
चंदीगड : वडिलांच्या मृत्यूनंतर पैशासाठी आपल्या वृद्ध आईला घरातून हाकलून दिल्याचा गंभीर आराेप पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्याेतसिंग सिद्धू यांच्यावर खुद्द त्यांची माेठी बहीण सुमन तूर यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सिद्धू यांच्यावर आराेप करण्यात आल्यामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
सुमन या अमेरिकेत वास्तव्याला आहेत. सध्या त्या चंदिगडमध्ये असून, त्यांनी मुलाखतीमध्ये सिद्धू यांच्यावर गंभीर आराेप केले. त्यांनी सांगितले की, सिद्धू हे क्रूर व्यक्ती आहेत. वडील भगवंत यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी आई निर्मल व मला १९८६ मध्ये घराबाहेर काढले. त्यानंतर एका रेल्वे स्थानकावर आईचा बेवारसपणे मृत्यू झाला. आम्ही त्या काळात अतिशय कठीण प्रसंगांना ताेंड दिले. माझी आई चार महिने रुग्णालयात हाेती. मी जे सांगत आहे त्या सर्व गाेष्टींचे कागदाेपत्री पुरावे आहेत, असे सुमन म्हणाल्या. आई आणि वडिलांनी कायदेशीर पद्धतीने विभक्त झाल्याचा सिद्धू यांचा दावा खाेटा असल्याचे सुमन म्हणाल्या. मी २० जानेवारीला सिद्धू यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने भेटण्यास नकार दिल्याचे त्या म्हणाल्या. पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान हाेणार आहे.
सिद्धूने मला ब्लाॅक केले
वडील घर, जमीन आणि निवृत्तीवेतनाची रक्कम मागे साेडून गेले. त्या मालमत्तेसाठी सिद्धूने आम्हाला घराबाहेर काढून संबंध ताेडले, असे सुमन म्हणाल्या. आमच्याबद्दल त्यांनी आतापर्यंत सर्व खाेटे सांगितले. त्याने मला ब्लाॅक केले आहे, असेही सुमन यांनी सांगितले.
‘मी त्यांना ओळखत नाही’
सिद्धू यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांच्या पत्नी नवज्याेत काैर यांनी संबंधित महिलेला ओळखत नसल्याचे म्हटले आहे. सिद्धू यांचे वडील भगवंत यांना पहिल्या पत्नीपासून दाेन मुली हाेत्या. त्यांना ओळखत नाही, असे नवज्याेत काैर यांनी सांगितले.